भारतीय महिला क्रिकेट संघ व ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (14 डिसेंबर) पार पडला. मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत यजमान संघावर 21 धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी ही सामन्याची मानकरी ठरली.
Australia win the third T20I by 21 runs.#TeamIndia will look to bounce back in the next game 👍
Scorecard ▶️ https://t.co/jH1N1O1Koc #INDvAUS pic.twitter.com/K8MAATKJ8O
— BCCI Women (@BCCIWomen) December 14, 2022
मालिकेतील दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने आपल्या नावे केला होता. त्याच सामन्यातील आत्मविश्वास घेऊन हरमनप्रीत कौर हिचा संघ सामन्यात उतरला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली ही केवळ एक धाव करून पहिल्या षटकात बाद झाली. तर, दुसऱ्या सामन्यात नाबाद खेळी करणारी ताहिला मॅकग्रा ही देखील केवळ खाते खोलून तंबूत परतली. अनुभवी बेथ मूनीने 30 धावांचे योगदान दिले. मात्र, एलिस पेरीने ग्रेस हॅरिसला साथीला घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पेरीने 47 चेंडूवर 73 तर ग्रेसने केवळ 18 चेंडूवर 41 धावांची वादळी खेळी केली. या योगदानामुळेच ऑस्ट्रेलिया संघाने 8 बाद 172 अशी मजल मारली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर स्मृती मंधाना एकाच धावेवर माघारी परतली. तर जेमिमा रॉड्रिग्ज 16 धावांवर बाद झाली. दुसऱ्या बाजूने सलामीवीर शफाली वर्मा हिने झुंज देत अर्धशतक साजरे केले. मात्र ती त्यानंतर फार काळ टिकू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने 37 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या सामन्यात चमकदार खेळ करणाऱ्या रिचा घोष व देविका वैद्य या प्रत्येकी एक धाव करून बाद झाल्या. दीप्ती शर्माने नाबाद 25 धावा करत एकाकी संघर्ष केला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे भारतीय संघ केवळ 151 पर्यंत मजल मारू शकला.
(Australia Womens Beat India Womens By 21 Runs)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?