---Advertisement---

विराटची फिफ्टी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव; टीम इंडियाला मालिकेवरही सोडावं लागलं पाणी

Ind-vs-Aus
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला. या विजयात गोलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. यावर्षीच्या अखेरीस वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने दमदार कामगिरी केली आहे. मात्र, भारताचा पराभव झाल्याने खेळाडूंसह चाहतेही निराश आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाचा डाव 49 षटकातच संपुष्टात आला होता. त्यांनी सर्व विकेट्स गमावत 269 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सर्वबाद गमावत 248 धावाच केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 21 धावांनी जिंकला.

विराटचे अर्धशतक व्यर्थ
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 72 चेंडूंचा सामना करत 52 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या (40), शुबमन गिल (37), केएल राहुल (32), रोहित शर्मा (30), रवींद्र जडेजा (18) आणि मोहम्मद शमी (14) यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात हे खेळाडू अपयशी ठरले. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव या मालिकेतील तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. तसेच, कुलदीप यादव 6 आणि अक्षर पटेलही 2 धावा करून धावबाद झाला. मोहम्मद सिराज 3 धावांवर नाबाद राहिला.

यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पा यानेही सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 45 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, ऍश्टन एगर याने 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त सीन एबॉट आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

ऑस्ट्रेलियाचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 47 चेंडूत 47 धावा केल्या. त्यात 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ऍलेक्स कॅरे याने 38 धावांचे योगदान दिले. तसेच, ट्रेविस हेड (33), मार्नस लॅब्युशेन (28), सीन एबॉट (26), मार्कस स्टॉयनिस (25), डेविड वॉर्नर (23), ऍश्टन एगर (17), मिचेल स्टार्क (10) आणि ऍडम झम्पा (10) या खेळाडूंनी दोन आकडी धावसंख्या उभारली. फक्त स्टीव्ह स्मिथ याला 0 धावेवर तंबूत परतावे लागले.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या जोडगोळीने सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
विशेष म्हणजे, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्या सामन्यात हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात परतला. यावेळी भारताला 10 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. (Australia won by 21 runs against india 3rd odi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझा स्टँडर्ड आभाळाएवढा…’, सिराजने कॅच सोडताच संतापला जडेजा, पण गावसकरांच्या प्रतिक्रियेने जिंकले मन
‘हिटमॅन’चा भीमपराक्रम! बनला आशियामध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा 8वा भारतीय, जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---