ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि त्यांच्या चाहत्यांसाठी १५ जून हा खास दिवस आहे. या दिवशीच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. तब्बल ६६ वर्षांनंतरही ऑस्ट्रेलियाचे इतर संघ हा स्वतःचाच विक्रम तोडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने त्या डावात ७५८ धावा केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, डाव घोषित केला नसता तर, या धावांमध्ये आणखी काही धावा जोडल्या जाऊ शकल्या असत्या.
अनेक अर्थांनी विक्रमी सामना
इयान जॉन्सन यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने १९५५ मध्ये वेस्ट इंडिज दौरा केला. किंग्सटन येथे ११ जूनपासून सुरू झालेला हा सामना मालिकेतील चौथा कसोटी सामना होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३५७ धावा केल्या. ज्यामध्ये क्लाईड वॉलकॉट यांनी १५५ धावांची शानदार खेळी खेळली. त्यांच्या व्यतिरिक्त फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स यांनीही अर्धशतके ठोकले. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कीथ मिलर यांनी १०७ धावांत ६ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्या
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे पहिले दोन फलंदाज अवघ्या ७ धावांमध्ये तंबूत परतले. मात्र, त्यानंतर घडले ते केवळ चकित करणारे होते. नील हार्वेच्या दुहेरी शतकासहित संघाच्या पाच फलंदाजांनी शतके केली. सलामीवीर कॉलिन मॅकडोनाल्ड १२७, नील हार्वे २०४, किथ मिलर १०९, रॉन आर्चर १२८ आणि रिची बेनो यांनीही आठव्या क्रमांकावर येत १२१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ८ बाद ७५८ धावा करुन डाव घोषित केला.
ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
वेस्ट इंडीजचा दुसरा डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने सामना एक डाव आणि ८२ धावांनी आपल्या नावे केला. आत्तापर्यंत जॉन्सन यांच्या ऑस्ट्रेलियन संघाचा हा विक्रम कायम आहे. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची ही मालिका ३-० अशी जिंकली.
पुन्हा कोणताही ऑस्ट्रेलिया संघ करू शकला नाही अशी कामगिरी
इयान जॉन्सन यांच्या संघाला जमलेली ही कामगिरी पुढे कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघाला करून दाखवता आली नाही. पुढे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ग्रेग चॅपेल, मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पॉंटिंगने व मायकल क्लार्क या कर्णधारांनी केले मात्र, या विक्रमाला ते पार करू शकले नाहीत. २००३ मध्ये स्टीव वॉच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाने झिंबाब्वे विरूद्ध केलेली ६ बाद ७३५ हे धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात्तम धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
INDvNZ: टीम इंडिया, सिनेमातील पोलीसांप्रमाणे काम करा; दिग्गजाच्या छुप्या संदेशाचा अर्थ काय?
अंडी-ब्रेड, डिडिएलजे अन् बरंच काही! भारतीय खेळाडूंचा ‘रॅपीड फायर’ सेशन बनवेल तुमचाही दिवस