एप्रिल महिन्यात मोठ्या उत्साहाने सुरुवात झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला भारतात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका बसला. हा हंगाम सुरु असतानाच संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढू लागली, त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने २९ सामन्यांनंतर ४ मे रोजी हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला. त्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या मायदेशी रवाना झाले. मात्र, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सीमाबंदीमुळे लगेचच ऑस्ट्रेलियाला परतू शकत नव्हते. पण अखेर २ आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण ताफा सोमवारी (१७ मे) मायदेशी परतला.
ऑस्ट्रेलियन सदस्य मालदीवमधून ऑस्ट्रेलियाला रवाना
ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून परत येणाऱ्या नागरिकासांठी सीमाबंदी केली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि समालोचकांसमोर परत ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पेच उभा राहिला होता. अखेर ते भारतातून मालदीवला रवाना झाले. तिथे २ आठवडे राहिल्यानंतर अखेर ३८ जणांचा ऑस्ट्रेलियन सदस्यांचा ताफा बीसीसीआयने व्यवस्था केलेल्या चार्टर फ्लाईटने मालदीवमधून सोमवारी सिडनी येथे पोहचला.
ऑस्ट्रेलियन सदस्यांच्या या ताफ्यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स असे अनेक स्टार खेळाडू होते.
ऑस्ट्रेलियामध्ये व्हावे लागणार क्वारंटाईन
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की क्रिकेटपटूंनाही सामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांसारखीच वागणूक दिली जाणार आहे. त्यामुळे सिडनीमध्ये परतल्यानंतर खेळाडूंना १४ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन रहाणे अनिवार्य असेल.
माईक हसीही पोहचणार ऑस्ट्रेलियात
ऑस्ट्रेलियन सदस्य जेव्हा आयपीएलचा हंगाम स्थगित झाला होता तेव्हा मालदीवला रवाना झाले होते. पण त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळत असलेला ऑस्ट्रेलियाचा माईक हसी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला भारतातच क्वारंटाईन रहावे लागले. पण आता त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून तो देखील लवकरच कतारमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना होणे अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी सुखरुप परतल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् मनदीप सिंग उतरला दक्षिण आफ्रिकेकडून क्षेत्ररक्षणासाठी तेही टीम इंडियाविरुद्ध, ‘हे’ होते कारण
इंग्लंड दौर्यावर एकाच विमानाने जाणार भारताचे पुरुष आणि महिला संघ, पण बीसीसीआय करणार ‘हा’ भेदभाव






