भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न येथे शनिवारी (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. हा सामना ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना म्हणूनही ओळखला जाईल. परंतु नाताळच्या आठवड्यात खेळण्यात येणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे कुटुंबीय त्यांच्यासोबत नसतील. महत्त्वाचे म्हणजे, ४० वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना कुटुंबाविना ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना खेळावा लागणार आहे.
‘बॉक्सिंग डे’ म्हणजे काय?
‘बॉक्सिंग डे’ हा नाताळचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक देशांत मालकांकडून त्याच्या नोकर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभरातील चांगल्या कामाची भेट म्हणून ख्रिसमस बॉक्स दिला जातो. तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक हे देखील एकमेकांना खास भेट देतात. त्यामुळे या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हटले जाते.
पहिला ‘बॉक्सिंग डे’ सामना १९५० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या संघात मेलबर्न येथे झाला होता. त्यानंतर १९८० पासून ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचे कायमचे ठिकाण बनले. या सामन्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे कुटुंबीय उपस्थित होते. तेव्हापासून दरवर्षी ही परंपरा कायम राखली जाते.
सर्व खेळाडूंना संघ कुटुंबाप्रमाणे वाटतो
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर याविषयी बोलताना म्हणाले की, “४० वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे की मी माझ्या कुटुबांसोबत नाही. माझे म्हणणे आहे की, खेळाडूंसोबत राहणेच योग्य असेल. जे खेळाडू आणि कर्मचारी कुटुंबाविना आहेत, त्यांनी २०२०मध्ये मोठे योगदान दिले आहे. खरे सांगायचे झाले तर, संघात सर्वांना कुटुंबासारखे वाटते. सर्वजण एकजुटीने राहतात.”
३० हजार प्रेक्षकांना प्रवेश
शनिवारी सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने ३० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. जरी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्ती हा सामना पाहायला आल्या, तरी जैव- सुरक्षित वातावरणामुळे खेळाडू त्यांना भेटू शकणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
पिता बनलेला नटराजन अजूनही ऑस्ट्रेलियात, त्याच्यासाठी वेगळे नियम का?, गावसकरांचा बीसीसीआयला सवाल