रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १८ धावा राखून विजय मिळवला. आरसीबीला मिळालेल्या विजयाचे अधिक श्रेय जरी कर्णधार फाफ डू प्लेसिसला जात असेल, तरी वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडचे प्रदर्शन देखील वाखाणण्यासारखे होते.
फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) खेळलेल्या ६४ चेंडूत ९६ धावा केल्या, पण त्याचे शतक थोडक्यात हुकले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. परंतु दुसरीकडे जोश हेजलवुड (Josh Hazelwood) यानेदेखील महत्वाचे योगदान दिले. हेजलवुडने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २५ धावा खर्च करून लखनऊच्या ४ खेळाडूंना तंबूत पाठवले. त्याने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या विकेट्स घेतल्या आणि विजय पक्का केला.
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात हेजलवुडसाठी आरसीबीने मोठी रक्कम खर्च केली होती. आता हेजलवुड देखील त्याची परतफेड करताना दिसत आहे. त्याने हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०.७५ची सरासरी आणि ७.१७च्या इकॉनॉमीसह ८ विकेट्स घेतल्या आहेत.
सीएसकेविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्याने ३३ धावा खर्च करून १ विकेट घेतली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना २८ धावा खर्च करून ३ विकेट्स नावावर केल्या होत्या. अशातच आता मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना २५ धावा खर्च करत ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेजवुडसाठी हा आयपीएचा तिसरा हंगाम आहे. पहिल्या हंगामात म्हणजेच २०२०मध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. मुंबईने त्याला ३ सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्याने १ विकेट घेतली होती. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. सीएसकेसाठी खेळलेल्या ९ सामन्यात त्याने ११ विकेट्स नावावर केल्या होत्या. आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या १५ सामन्यात त्याने २२.१५ची सरासरी आणि ७.७७च्या इकॉनॉमीसह २० विकेट्स नावावर केल्या आहेत.
मागच्या हंगामातील उत्कृष्ट प्रदर्शानानंतर सीएसकेने मेगा लिलावात हेजलवुडला पुन्हा खरेदी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आरसीबीने अखेर बाजी मारली. मेगा लिवातात त्याला खरेदी करण्यासाठी आरसीबी आणि सीएसके व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सारखे संघ देखील इच्छुक होते. परंतु शेवटी आरसीबीने ७.७५ कोटी खर्च करून त्याला ताफ्यात सहभागी केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला
विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले