क्रिकेट जगतात चेंडू छेडछाड प्रकरण गाजत असतानाच ऑस्ट्रेलियातील खेळाडूंमध्येही आता वाद झाले असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघातील बहुतेक खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर नाराज आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला ३२२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच याच सामन्यादरम्यान चेंडू छेडछाड प्रकरण झाले असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला आहे.
पण या सगळ्याची वॉर्नरला कसलीही चिंता नसल्याचे त्याच्या वागणुकीतून दिसून आली आहे. Foxsports.com.au मधील वृत्तानुसार, ज्यादिवशी ऑस्ट्रेलिया संघ पराभवामुळे आणि चेंडू छेडछाड प्रकरणामुळे संघर्ष करत असताना वॉर्नर हॉटेलमध्ये पार्टी करत होता. याच गोष्टीवर वॉर्नरचे संघसहकारी नाराज आहेत. त्याने ही पार्टी क्रिकेटपटूनबरोबर न करता त्याच्या अन्य सहकाऱ्यांबरोबर केली.
त्याच्या या वागणुकीमुळे ऑस्ट्रलियाच्या खेळाडूंनी व्यवस्थापनाला बजावलेही होते की जर वॉर्नर हॉटेलमधून निघून गेला नाही तर वॉर्नरमध्ये आणि बाकी खेळाडूंमध्ये वाद होऊ शकतात. तसेच वॉर्नरने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर वॉर्नरने आॅस्ट्रेलियन खेळाडूंचा व्हॉट्सअप ग्रुपही सोडला आहे.
या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथला आणि सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्टवर आयसीसीने कारवाई देखील केली आहे. याचबरोबर या प्रकरणामुळे स्मिथला कर्णधार पदावरून तर वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
ज्या दिवशी हा प्रकार सामन्यात घडला त्यानंतर स्मिथने आणि बॅनक्रोफ्टने ही चूक झाल्याचे मान्यही केले होते. त्याचबरोबर स्मिथने पत्रकार परिषदेत असेही सांगितले आहे की, चेंडू सोबत छेडछाड करणे हे वॉर्नर आणि संघातील वरीष्ठ खेळीडूंनी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात ठरवले होते.
काही वृत्तांनुसार वॉर्नर हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असण्याची शक्यता आहे. चेंडू छेडछाड ही सगळी कल्पना वॉर्नरची होती. त्याला स्मिथने सहमती दर्शवली. याचमुळे स्मिथप्रमाणेच वॉर्नरलासुध्दा चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.