मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी आयसीसीनं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023/25 च्या अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं. यावेळी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमवर 11 ते 15 जून दरम्यान खेळला जाणार आहे.
दरम्यान, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल तीन सामन्यांची असावी आणि हे तीन सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जावेत, असं मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन यानं व्यक्त केलंय. यामुळे संघांना वर्चस्व दाखवण्याची संधी मिळेल आणि त्यांना मालिका 3-0 अशी जिंकण्याची संधी मिळेल, असं लायन म्हणाला.
हा 36 वर्षीय अनुभवी फिरकीपटू म्हणाला, एकाच सामन्याऐवजी अधिक सामन्यांच्या अंतिम फेरीमुळे कसोटी क्रिकेटला अधिक अचूकता मिळेल. विशेष म्हणजे, नॅथन लायनपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील WTC फायनल तीन सामन्यांची करण्याबाबत बोलला होता.
लायन आपल्या वक्तव्यात म्हणाला, “ही टूर्नामेंट स्पर्धा नाही, ज्यामध्ये तुम्ही 2 सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करू शकत नाही. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला 2 वर्षांपर्यंत सातत्यानं चांगली कामगिरी करावी लागते. मला WTC फायनलमध्ये 3 सामन्यांची मालिका बघायची आहे. यामुळे संघांना आपलं वर्चस्व दाखवण्याची आणि 3-0 नं जिंकण्याची संधी मिळू शकते. फायनलसाठी जास्त वेळ शिल्लक नाही आणि ते एक आव्हान असेल, पण ही गोष्ट मला बदललेली पाहायला आवडेल.”
सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियानं या टप्प्यात आतापर्यंत फक्त एकच कसोटी मालिका खेळली, ज्यामध्ये भारतानं इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. भारताची गुणांची टक्केवारी 68.52 आहे. टीम इंडियाला येत्या काही महिन्यांत बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.
दुसरीकडे, गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कांगारुच्या गुणांची टक्केवारी 62.50 आहे. नोव्हेंबर ते जानेवारी 2025 दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कांगारू भारताविरुद्ध खेळणार आहेत.
हेही वाचा –
आयसीसी क्रमवारीत जो रुटचा दबदबा, बाबर आझम टॉप-10 मधून बाहेर; विराट-रोहितचं स्थान कितवं?
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक