इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स बऱ्याच दिवसांनंतर मैदानावर खेळताना दिसणार आहे. आगामी ऍशेस मालिकेपूर्वी त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अशातच आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी बेन स्टोक्सविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वॉनच्या मते ऑस्ट्रेलियन संघ बेन स्टोक्सला घाबरतो. त्यांच्या मते स्टोक्स ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघासाठी धोकादायक ठरू शकतो.
आगामी ऍशेस मालिकेसाठी आधी जेव्हा इंग्लंडच्या संघाची घोषणा केली गेली होती, त्यावेळी संघात बेन स्टोक्सचे नाव सामील केले गेले नव्हते. मात्र, आता या मालिकेसाठी स्टोक्सचे नाव संघात सामील केले गेले आहे. इंग्लंड संघाने या गोष्टीची अधिकृत घोषणा केली आहे की, स्टोक्स ऍशेस मालिकेत संघाचा भाग असणार आहे.
ऑस्ट्रेलिया स्टोक्सला घाबरते
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी द टेलीग्राफ वृत्तपत्रातील त्यांच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियन संघ स्टोक्सला घाबरतो. त्यांनी कॉलममध्ये लिहीले की, “बेन स्टोक्स एक असा खेळाडू आहे, ज्याला ऑस्ट्रेलिया संघसुद्धा घाबरतो. हेडिंग्लेमध्ये दोन वर्षांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाला जो घाव दिला होता, तो आतापर्यंत पूर्णपणे भरला नसेल. ब्रिस्बेन किंवा जेथे तो त्याचा पहिला कसोटी सामना खेळेल, तेथे विरोधी संघाला धोका नक्कीच जाणवेल. ऑस्ट्रेलियामध्ये बेन स्टोक्सही चांगली कामगिरी करू इच्छित असेल.”
दरम्यान, बेन स्टोक्सने मागच्या काही काळापासून क्रिकेटमधून मानसिक आरोग्याच्या कारणास्तव अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. याव्यतिरिक्त आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात खेळताना त्याच्या बोटाला दुखापतही झाली होती. त्यानंतर त्याच्या बोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आणि तो आता खेळण्यासाठी पूर्णपणे फिट झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्टोक्सला भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आणि सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सहभागी होता आले नही. मात्र, आता तो मैदानावर पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे आणि ऍशेस मालिकेत खेळताना दिसणार आहे.