---Advertisement---

न्यूझीलंडच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘हा’ अनुभवी गोलंदाज झाला स्पर्धेबाहेर

On: मंगळवार, ऑक्टोबर 26, 2021 9:05 PM
---Advertisement---

सातव्या टी२० विश्वचषक स्पर्धेत यावर्षी विजेतेपदाचे दावेदार म्हणून केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ उतरला आहे. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या बलाढ्य आशियाई संघांसह त्यांचा ब गटामध्ये समावेश आहे.मात्र स्पर्धेतील आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला जबर धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर पडला.

अशी झाली दुखापत
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती देताना म्हटले,
‘लॉकीच्या उजव्या मांडीमध्ये काहीसा तणाव दिसून आला होता. त्यानंतर एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्याचा स्नायू फाटला असल्याचे स्पष्ट झाले. यामधून सावरण्यासाठी त्याला चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागेल. याचाच अर्थ तो आता विश्वचषकात सहभागी होणार नाही.’
मंगळवारी (२६ ऑक्टोबर) न्यूझीलंड पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळत आहे.

न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले,
“विश्वचषकाच्या सुरुवातीला अशी बातमी येणे खूपच दुर्दैवी आहे. तो आमच्या विश्वचषक मोहिमेचा प्रमुख खेळाडू होता. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे.”
लॉकी फर्ग्युसन स्पर्धेबाहेर गेल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेचा पंधरा सदस्य संघात समावेश करण्यात आला आहे. मिल्नेचा याआधीच तीन राखीव खेळाडूंमध्ये समाविष्ट होता.

आयपीएलमध्ये केली होती शानदार कामगिरी
लॉकी फर्ग्युसनने नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२१ मध्ये शानदार कामगिरी केली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याने ८ सामने खेळताना १३ बळी मिळवले होते. तो सातत्याने १४५ पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यास सक्षम मानला जातो. कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---