Australia Playing 11 For WTC Final: उद्यापासून म्हणजेच गुरुवार, 11 जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे. इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे हा जेतेपदाचा सामना खेळला जाईल. या दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या फायनल सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीवीराची निवड ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरली आहे. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर 4 खेळाडूंना सलामीवीर म्हणून आजमावण्यात आले आहे. आता पाचवा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सलामीला येताना दिसेल. हो, सॅम कॉन्स्टास, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड आणि नॅथन मॅकस्वीनी यांच्यानंतर मार्नस लाबुशेन हा नवा सलामीवीर आहे.
जोश हेझलवूड देखील संघात परतला आहे. हेझलवूडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील फक्त 2 सामने खेळले. आयपीएल 2025 पासून हेझलवूड क्रिकेट मैदानावर परतला. कॅमरन ग्रीनलाही नवीन भूमिका देण्यात आली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर संघ खूप मजबूत दिसत आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनची जोडी डावाची सुरुवात करेल. यानंतर, अष्टपैलू कॅमरन ग्रीन तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर येईल.
यानंतर, ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर दिसेल. लॉर्ड्सच्या मैदानावर हेड दक्षिण आफ्रिकेसाठी समस्या बनू शकतो. त्यानंतर अष्टपैलू ब्यू वेबस्टर सहाव्या क्रमांकावर येईल. यष्टीरक्षक अॅलेक्स केरी सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. कर्णधार पॅट कमिन्सकडे मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडच्या रूपात 3 वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, ग्रीन आणि वेबस्टरच्या रूपात 2 मध्यमगती गोलंदाज आहेत आणि फिरकी गोलंदाज म्हणून नॅथन लायन.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11- उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड






