भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बीसीसीआयने पूर्ण सुरक्षेचे पालन करून आयपीएलचे आयोजन केले असले तरी देखील आपल्या देशातील सीमा बंद होण्याच्या भीतीने तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतले आहेत. अशातच मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज क्रिस लीन याने आयपीएल २०२१ हंगाम संपल्यानंतर खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान पाठवण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. ही मागणी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी फेटाळून लावली आहे.
क्रिस लिनने केलेल्या मागणीला ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी फेटाळून लावत म्हटले आहे की, “आयपीएल स्पर्धा खेळत असलेल्या सर्व खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कुठलीही विशेष सुविधा दिली जाणार नाही. हा ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा नाहीये. खेळाडू आपल्या वैयक्तिक करारानुसार स्पर्धा खेळण्यासाठी गेले आहेत.” ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आजपासून भारतातून येणाऱ्या सर्व विमनांवर बंदी घातली आहे.
क्रिस लिनने केली होती चार्टर्ड विमानाची मागणी
न्यूज कॉर्प मीडियाशी बोलताना लिन म्हणाला होता की, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया दरवेळी आयपीएल करारापैकी १० टक्के रक्कम घेते. मग यातील काही पैसे यंदा हंगाम संपल्यानंतर खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाच्या व्यवस्थेवर खर्च केले जाऊ शकत नाहीत का? मला जाणीव आहे की, लोक आमच्यापेक्षाही वाईट स्थितीत आहेत. परंतु आम्ही इथे कडक जैव सुरक्षित वातावरणात आहोत. याबरोबरच पुढील आठवड्यात आम्हाला कोरोनाची लसही देण्यात येणार आहे. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियन सरकारकडून अपेक्षा करतो की ते आमच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करतील.”
आयपीएल २०२१ चा हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ९ एप्रिलपासून सुरु झालेल्या या स्पर्धेतील साखळी सामने २३ मे पर्यंत खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर नॉकआउट सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात मिळाला नाही खरेदीदार, चेन्नईनेही दिला डच्चू; आता मुंबईसाठी बजावणार ‘ही’ भूमिका
मोठी बातमी! टी नटराजनच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती






