इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धा जरी अनिश्चित काळासाठी स्थगित जरी झाली असली तरी या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. यातील महत्त्वाचे नाव म्हणजे वेगवान गोलंदाज आवेश खान. या २४ वर्षीय गोलंदाजाने या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ७ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. तो या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.
दरम्यान, तो या आयपीएल हंगामात सर्वात आधी प्रकाशझोतात आला तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात. त्याने या सामन्यात २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या दोन विकेट्स त्याने एमएस धोनी आणि फाफ डू प्लेसिस या फलंदाजांच्या घेतल्या होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही फलंदाजांना त्याने शुन्यावर बाद केले होते. या विकेट्सबद्दल आता आवेशने भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने धोनीची विकेट घेण्यासाठी त्याची मदत केली होती.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आवेश खानने सांगितले की ‘शेवटच्या काही विकेट्स बाकी होत्या. पंतला माहित होते की धोनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला हे देखील माहित होते की धोनी ४ महिन्याच्या विश्रांतीनंतर खेळत होता आणि त्यामुळे त्याच्यासाठी हे सोपे नव्हते. पंतने मला केवळ आखुड टप्प्याचे चेंडू टाक म्हणून सांगितले. मी केवळ तेच केले. धोनीने हिट करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बॅटीच्या आतल्या बाजूला चेंडू लागून तो त्रिफळाचीत झाला.’
याबरोबरच रिषभ पंत कशा प्रकारे गोलंदाजी करताना मदत करतो, याबद्दलही आवेश खानने सांगितले. तो म्हणाला, ‘मी जेव्हा गोलंदाजीसाठी रन-अप घेण्यास सुरुवात करायचो, तेव्हा मी पंतकडे पाहायचो. त्यावेळी फलंदाज केवळ माझ्याकडे बघत असायचा आणि दुसरीकडे कुठेही त्याचे लक्ष नसायचे. त्यामुळे, जर पंतला वाटायचे की मी यॉर्कर चेंडू टाकायला हवा तर त्यासाठी आम्ही खुण ठरवली होती. जर त्याला वाटायचे की मी वाईड आऊटसाईड ऑफला चेंडू टाकावा तर मला त्याने केलेल्या खुणेवरुन कळायचे.’
आवेशची झाली इंग्लंड दौऱ्यासाठी निवड
आवेशने आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला एक आनंदाची बातमी मिळाली. पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय संघाची शुक्रवारी (७ मे) निवड झाली आहे. या संघात ४ राखीव खेळाडूंची निवड झाली असून यात आवेश खानचा समावेश आहे.
महत्त्वाची बातमी –
शेफाली वर्माची बॅट पुन्हा तळपणार, खेळणार इंग्लंडमधील ‘या’ स्पर्धेत
आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले ‘हे’ दोन खेळाडू परतले घरी