तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यापासून त्याचा प्रभाव सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबद्दलही बरेच काही बोलले जात आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आयसीसी टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र अफगाणिस्तान बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांचा संघ केवळ या स्पर्धेचा भाग होणार नाही; तर एक मजबूत आव्हान देण्यासाठीही सज्ज आहे. त्यासाठी ते नवनवीन योजनाही राबवत आहेत.
मंगळवारी (17 ऑगस्ट) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर एक मोठी घोषणा केली आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आविष्का गुणवर्धने यांना संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात येत असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. ही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही याबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आविष्का गुणवर्धने यांनी आपल्या जवळजवळ एक दशकाच्या कारकिर्दीत 6 कसोटी आणि एकूण 61 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर कसोटीत फक्त 181 धावा आहेत. तर त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1708 धावा केल्या आहेत. अविष्का यांची अफगाणिस्तानसोबत प्रशिक्षक म्हणून नव्या कारकिर्दीची सुरुवात असेल. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाविरुद्धच्या मालिकेत ते अफगाणिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात करतील. अफगाणिस्तानला दोन्ही संघांविरुद्ध 3-3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या राशीद खानने देशाच्या परिस्थितीबद्दल खूप चिंतीत असल्याचे म्हटले होते. त्याचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकल्यामूळे तो व्यतिथ झाला आहे. राशीद सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धेत सहभागी झाला आहे. मात्र तो आणि इतर अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएलचा उर्वरीत हंगाम खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचं काय घेऊन बसलाय, इंग्लंडच्या वृत्तपत्रातही भारताच्या विजयाचा डंका; ‘फ्रंटपेज’वर झळकली बातमी
लॉर्ड्स कसोटीचा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी, तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ विस्फोटक फलंदाजांला बोलावणार!
‘मियाँ मॅजिक’पुढे इंग्लंडची पळता भुई थोडी, थरारक विजयानंतर कडक नाचला; व्हिडिओ तुफान व्हायरल