न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा दुसरा दिवस (२६ नोव्हेंबर) पाहुण्या संघाच्या नावे राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांचा बोलबाला राहिला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांची अभेद्य भागिदारी तोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
त्यातही फिरकीपटू अक्षर पटेल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याच्या या गोलंदाजी कामगिरीमुळे त्याच्या नावावार एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
२७ वर्षीय डावखुरा गोलंदाज अक्षर हा आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ४ सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजांच्या मांदियाळीत सहभागी झाला आहे. त्याने या यादीत दुसरे स्थान गाठले आहे.
Stupendous bowling performance from @akshar2026 today ????????#INDvNZ @Paytm pic.twitter.com/8tbMK6fitk
— BCCI (@BCCI) November 27, 2021
फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अक्षरचा हा केवळ चौथाच कसोटी सामना आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन केले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३३ षटके गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम, रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम ब्लंडल आणि टीम साउदी यांचा समावेश आहे.
या ५ विकेट्स मिळवत अक्षरने कसोटीतील ३२ विकेट्सचा आकडा गाठला आहे. यासह तो पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अक्षरने या विक्रमाच्या बाबतीत आपलाच संघ सहकारी आणि फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला मागे टाकले आहे. अश्विनने त्याच्या पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये २६ विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत माजी गोलंदाज नरेंद्र हिरवानी हे अव्वलस्थानी आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ३६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच एस वेंकटराघवन, एल शिवरामकृष्णन आणि जसप्रीत बुमराह २१ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच रविंद्र जडेजा २० विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.
पहिल्या चार सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज
३६ – नरेंद्र हिरवाणी
३२*- अक्षर पटेल
२६ – आर अश्विन
२१ – एस वेंकटराघवन/एल शिवरामकृष्णन/जसप्रीत बुमराह
२० – रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी आता सांगू शकतो का?’, रिटेंशनविषयी सीएसकेने विचारलेल्या प्रश्नावर जडेजाची मजेशीर प्रतिक्रिया
‘तर भारत मायदेशात डीआरएस वापरावर बंदी आणू शकतो’, न्यूझीलंडच्या अष्टपैलूने घेतली फिरकी
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा १२ वा खेळाडू मैदानात, ‘या’ कारणामुळे साहाऐवजी केएस भरतला यष्टीरक्षणाची संधी






