आयपीएल २०२२चा एकोणिसावा सामना रविवारी (१० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीला त्यांच्या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल याने शेवटी धुव्वादार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या २१५ पर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यादरम्यान त्याने अष्टपैलूंचा मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दिल्लीकडून सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी धुव्वादार अर्धशतके ठोकली. त्यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची शानदार भागीदारी झाली. या सलामी जोडीनंतर कर्णधार रिषभ पंतने आक्रमक खेळी करत २७ धावांचे योगदान दिले.
शेवटी अष्टपैलू अक्षर (Axar Patel) आणि शार्दुल ठाकूर यांनी ताबडतोब खेळी करत संघाला धावांचा मोठा पल्ला पार करून दिला. अक्षरने १४ चेंडू खेळताना नाबाद २२ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ षटकार आणि २ चौकारही मारले. या छोटेखानी पण धुव्वादार खेळीसह आयपीएलमधील आपल्या १००० धावा पूर्ण (Axar Patel 1000 IPL Runs) केल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ११३ सामने खेळताना १०२१ धावांची नोंद आहे. तसेच त्याच्या आयपीएलमध्ये ९० विकेट्सही नावावर आहेत.
यासह अक्षर आयपीएलमध्ये १००० धावा आणि ९० विकेट्स घेणारा केवळ चौथाच खेळाडू ठरला (Fourth Player To Make 1000 Runs & 90 Wickets In IPL) आहे. त्याच्यापूर्वी ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि शेन वॉटसन यांच्या नावावर आयपीएलमधील हा प्रशंसनीय विक्रम आहे.
आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा शेन वॉटसन सध्या आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून सहभागी झाला आहे. त्याने आयपीएलमध्ये १४५ सामने खेळताना ३८७४ धावा आणि ९२ विकेट्स घेतल्या होत्या. तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजा याच्या खात्यात २०४ सामन्यांमध्ये २४५२ धावा आणि १२८ विकेट्स आहेत. तर चेन्नईचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या ड्वेन ब्रावोच्या नावावर १५५ सामन्यांमध्ये १५४६ धावा आणि १७३ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
युझवेंद्र चहलला रात्रभर बांधून ठेवणाऱ्या ‘त्या’ क्रिकेटरची होणार चौकशी, बोर्डानेच घेतलाय मोठा निर्णय
विराट कोहली खरंच बाद होता का? जाणून घ्या काय सांगतो क्रिकेटमधील ‘हा’ नियम





