भारत आणि इंग्लंड मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. अशातच पाहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे संधी गमावणाऱ्या अक्षर पटेलने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत स्वतला सिद्ध केले आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तब्बल ६ गडी बाद केले आहेत. यानंतर आपल्या दमदार कामगिरीमागचे रहस्य त्याने सांगितले आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत बजावली महत्वाची भूमिका
भारतीय संघाने पहिला कसोटी सामना २२७ धावांनी गमावला होता. अशातच मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकणे गरजेचे होते. या कसोटी सामन्यातील एका डावात अक्षरने महत्वाची भूमिका बजावत ५ गडी बाद केले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने बळींचा पंचक केला आहे.
टी-२० क्रिकेटचा परिणाम कसोटी क्रिकेटवर दिसून येतोय
याविषयी बोलताना अक्षरने म्हटले की, “टी-२० क्रिकेटचा परिणाम हा कसोटी सामन्यांमध्ये देखील दिसून येत आहे. इंग्लंडचे फलंदाज खूपच आक्रमक होत आहेत. यामुळेच मी योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत गेलो. जर फलंदाज संथपणे बचावात्मक फलंदाजी करत असेल तर, तुम्ही बॅकफूटवर चालले जाता. परंतु फलंदाज जर चांगल्या प्रकारे फलंदाजी करत नसेल, म्हणजेच स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करत असेल तेव्हा आपल्याला कळते की हीच त्याला बाद करण्याची संधी आहे.”
अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळाला
इंग्लंड संघाला ११२ धावांवर बाद करण्यात आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली. आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसराच सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने ३८ धावा देत ६ गडी बाद केले. तर अश्विनने ३ गडी बाद केले.
याबद्दल अक्षर म्हणाला, “जेव्हा गोष्टी तुमच्या अनुसार घडत असतात. त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. माझे लक्ष विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचे होते. मला खेळपट्टीवरून मदत मिळत होती. मला त्याचा फायदा घ्यायचा होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
कुलदीपला वगळून वॉशिंग्टनला संधी का दिली? टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने सांगितले कारण
रोहित शर्माचा झंझावात! अर्धशतक करत घडवला इतिहास; ‘हा’ हिट विक्रम करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू
‘नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी रंग बदलणार नाही, कारण…’ मास्टर ब्लास्टरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य