मुंबईच्या आयुष म्हात्रेनं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू बनून नवा विश्वविक्रम रचला आहे. त्यानं या बाबतीत भारताच्याच यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड मोडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी (31 डिसेंबर) नागालँड विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात म्हात्रे यानं ही विक्रमी खेळी खेळली.
म्हात्रेनं 17 वर्षे 168 दिवसांच्या वयात जयस्वालचा 17 वर्षे 291 दिवसांचा विक्रम मोडला. जयस्वालनं 2019 मध्ये मुंबईकडून झारखंडविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. या मोसमाच्या सुरुवातीला मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या म्हात्रेनं केवळ 117 चेंडूंत 11 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीनं 181 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर मुंबईनं 50 षटकांत सात गडी गमावून 403 धावा केल्या.
मुंबईच्या विरार उपनगरातील रहिवासी आयुष म्हात्रे या मोसमाच्या सुरुवातीला संघात सामील झाल्यापासून सर्वच फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. 6 प्रथम श्रेणी सामन्यांव्यतिरिक्त म्हात्रे आतापर्यंत 5 लिस्ट-ए सामने खेळला आहे. तो इराणी चषक विजेत्या मुंबई संघाचा भाग होता. तसेच त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना 71 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी खेळली होती.
म्हात्रेनं महाराष्ट्राविरुद्ध 232 चेंडूंत 22 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 176 धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं हा सामना नऊ गडी राखून जिंकला. त्यानंतर तो त्रिपुरा आणि ओडिशाविरुद्ध आपला प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला, परंतु सर्व्हिसेसविरुद्ध 149 चेंडूत 116 धावांच्या खेळीसह त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपलं दुसरं शतक झळकावलं.
आयुष म्हात्रेनं यानंतर अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानं जपान (54) आणि यूएई (नाबाद 67) विरुद्ध अर्धशतकं झळकावली. तो सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये खेळला नाही, परंतु 50 षटकांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध 78 धावांची शानदार खेळी करून त्यानं पुनरागमन केलं.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त विविध देशांतर्गत सामन्यांचा समावेश होतो. लिस्ट-ए सामन्यांमध्ये एक डाव 40 ते 60 षटकांचा असतो.
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! हेड कोच गौतम गंभीरबाबत रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियासोबत यशस्वी का होत नाहीयेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
रिषभ पंतच्या बचावासाठी समोर आले संजय मांजरेकर, गावस्करांच्या टीकेला सडेतोड उत्तर!