भारतात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) तर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या टी२० लीगचा बोलबाला असतो. अजून आयपीएल २०२१ ची सुरुवात होण्यासाठी वेळ आहे. परंतु पीएसएल २०२१ चा श्रीगणेशा झाला आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने मोठा किर्तीमान केला आहे, जो आयपीएलमध्ये आधीपासूनच विराटच्या नावे जमा आहे.
त्याचे झाले असे की, शनिवारी (२१ फेब्रुवारी) क्वेटा ग्लैडिएटर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात पीएसएल २०२१ पहिला सामना झाला. या सामन्यात कराची किंग्सकडून खेळताना आझमने छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. २० चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने त्याने २४ धावा केल्या. यासह त्याने पीएसएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या सामन्यापुर्वी त्याला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या २२ धावांची आवश्यकता होती. परंतु आता २४ धावांसह १५४० धावांचा आकडा गाठत तो पीएसएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने कामरान अकमलला पिछाडीवर सोडले आहे. अकमल १५३७ धावांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
हेच जर आयपीएलविषयी बोलायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार असलेल्या विराटही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १९२ सामने खेळताना सर्वाधिक ५८७८ धावांसह हा विक्रम केला आहे. याबाबतीत त्याने मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला मागे टाकले आहे. रैना ५३६८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराटच्या पावलावर पाऊल ठेवत झाला आझमचा प्रवास
खास बाब अशी की, ज्याप्रकारे विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांपर्यंतचा प्रवास केला, अगदी त्याचप्रमाणे आझमनेही पीएसएलमध्ये प्रगती केली. विराटने २००८ मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. या हंगामात १३ सामन्यात तो अवघ्या १६५ धावा करू शकला होता. दुसरीकडे आझमने २०१६ मध्ये पीएसएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. या हंगामात तो २ सामन्यात फक्त १५ धावा करू शकला होता. परंतु पुढे दोघांनीही आपल्या प्रदर्शनात प्रगती करत सर्वाधिक धावांचे शिखर गाठले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, माजी खेळाडूचा दावा
भारतीय टी२० संघात सूर्यकुमार यादवची निवड होताच माजी निवडकर्त्याचे जुने ट्विट चर्चेत, ‘हे’ आहे कारण