भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मोटेरा स्टेडियमवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यात एका विशेष विक्रमाला गवसणी घालेल. इंग्लंडविरुद्धचा हा सामना इशांतच्या कसोटी कारकिर्दीतील १००वा सामना असेल. कपिल देव यांच्यानंतर भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो केवळ दुसरा वेगवान गोलंदाज असेल.
मात्र आता इशांत शर्मा भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा दुसराच नाही, तर शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, असे आश्चर्यकारक विधान भारताचे माजी खेळाडू विजय दहिया यांनी केले आहे. क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपामुळे हे घडू शकेल, असे मत दहिया यांनी व्यक्त केले.
“इथून पुढे वेगवान गोलंदाज १०० कसोटी सामने खेळणे कठीण”
भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा हा शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, असे भाकीत वर्तवताना विजय दहिया म्हणाले, “मी हे विधान अगदी खात्रीपूर्वक करू शकतो की इशांतनंतर कुठलाही भारतीय वेगवान गोलंदाज १०० कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणार नाही. हा टप्पा गाठणारा इशांत हा नक्कीच शेवटचा वेगवान गोलंदाज ठरेल. आजकाल अधिकाधिक वेगवान गोलंदाज स्वतःला आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत त्यांनी १०० कसोटी सामने खेळणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.”
गेली १६ वर्षे इशांतचा संघसहकारी असलेल्या आणि दिल्ली संघाचा विद्यमान कर्णधार प्रदीप संगवानने देखील यावेळी इशांतच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला, “ज्यावेळी इशांत शर्मा १७ वर्षाखालील वयोगटासाठी निवड चाचणी देत होता, तेव्हाच त्याच्यातील गुणवत्ता दिसून येत होती. तो अतिशय उंच होता आणि आपले केस देखील तो लांब ठेवायचा. त्यामुळे आम्ही त्याला उंच शाहरूख म्हणून देखील चिडवायचो. पण अर्थात त्याच्यातील गुणवत्ता वादातीत होती आणि तो एक खास गोलंदाज आहे, याची आम्हाला जाणीव होती.”
इंग्लंडविरुद्धचा सामना भारतासाठी आहे महत्वाचा
दरम्यान, मोटेरा येथील इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असल्यास भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे किंवा सामना अनिर्णीत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूने खेळावल्या जाणाऱ्या या सामन्यात इशांत शर्मा दमदार कामगिरी करून भारतीय संघाला विजय मिळवून देत आपला शंभरावा कसोटी सामना अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
सनरायझर्स हैद्राबादच्या खेळाडूच्या घरी चिमुकल्याचे आगमन, ट्विट करत शेअर केली आनंदाची बातमी
आयपीएल लिलावात मिळाला नाही भाव, पठ्ठ्याने सेंचूरी मारत फलंदाजीत दाखवला ताव; बघा कोण आहे तो?