ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होबार्टमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात पाहुण्या संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमला युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचण्याची संधी असेल. बाबर आझम टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11000 धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी काही खास राहिलेली नाही.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 11 हजार धावा करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिडचा महान फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलनं 2017 मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ही कामगिरी केली होती. 11 हजार धावा करण्यासाठी त्यानं 314 डाव घेतले. बाबर आझमबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 306 सामन्यांच्या 295 डावांमध्ये 43.61 ची सरासरी आणि 129.30 च्या स्ट्राईक रेटनं 10948 धावा केल्या आहेत. तो 11 हजार धावांच्या आकड्यापासून फक्त 52 धावा दूर आहे. गेलचा विश्वविक्रम मोडण्यासाठी बाबर आझमकडे 18 डाव आहेत.
जर आज बाबर आझम 11000 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील 11वा खेळाडू ठरेल. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, रोहित शर्मा, ॲरॉन फिंच आणि जेम्स विन्स यांनी ही कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील बाबरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झालं तर, पहिल्या सामन्यात त्याला नॅथन एलिसनं अवघ्या 3 धावांवर बाद केलं. तर दुसऱ्या सामन्यात त्याला झेवियर बार्टलेटनं त्याच धावसंख्येवर बाद केलं. पहिल्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तर दुसऱ्या टी20मध्ये त्यानं डावाची सुरुवात केली होती.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर मालिकेत चेतेश्वर पुजाराची एंट्री! या नव्या भूमिकेत दिसणार
“गौतम गंभीर रडारवर आहे, ऑस्ट्रेलियात अपयशी ठरला तर….”; माजी सहकाऱ्याचं सूचक वक्तव्य
ओमानच्या खेळाडूने विश्वविक्रम केला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच