पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक स्पर्धेतील २४ वा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या खेळी दरम्यान विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
बाबर आझमने या सामन्यात ५१ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून १००० धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये वेगवान १००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने १००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी २६ डाव खेळले आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा कर्णधार विराटला मागे टाकले.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३० डावात १००० धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० धावा करण्याच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानी गेला आहे. तर तिसऱ्या स्थानी फाफ डु प्लेसिस आहे. प्लेसिसने हा टप्पा पार करण्यासाठी ३१ डाव खेळले होते. चौथ्या स्थानी असलेल्या ऍरॉन फिंचने ३२ डावात १००० धावांचा टप्पा पार केला होता. पाचव्या स्थानी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे. त्याने १००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ३६ डाव खेळले होते.
पाकिस्तानचा विजय
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १४७ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलबदिन नायब या दोघांनी संघाकडून प्रत्येकी नाबाद ३५ धावांची खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी ७ व्या विकेटसाठी ४५ चेंडूत ७१ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून इमाद वसीमने दोन तर शाहीन आफ्रिदी, हसन अली, शादाब खान आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रतिउत्तरादाखल, मैदानात उतरलेल्या पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तर, फखर जमानने ३० धावांची खेळी केली. पाकिस्तानला अखेरच्या दोन षटकात २४ धावांची गरज असताना असिफ अलीने १९ व्या षटकात ४ षटकार मारले आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्याने ७ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आजपर्यंतचे सर्व सात टी२० विश्वचषक खेळणारे ६ खेळाडू, भारताच्या रोहित शर्माचाही आहे समावेश
तेलही गेलं अन् तूपही गेलं! परेराकडून वॉर्नरला मिळालं ‘असं’ जीवदान की, सलामीवीरानं ठोकलं अर्धशतक