बांग्लादेशचा क्रिकेट संघ सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. मात्र पहिल्याच सामन्यात यजमान संघ मोठ्या अडचणीत सापडला.
पाकिस्तानचा संघ दीर्घ काळानंतर आपल्या भूमीवर कसोटी सामना खेळत आहे. मात्र या कसोटीत संघातील काही अनुभवी खेळाडूंची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली. यामध्ये स्टार फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे.
रावळपिंडी येथे सुरू असलेल्या या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं पहिला डाव 6/448 धावांवर घोषित केला. बाबर आझमला पहिल्या डावात खातंही उघडता आलं नाही, ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली.
प्रत्युत्तरात, बांगलादेशच्या संघानं पहिल्या डावात 565 धावा केल्या आणि पाकिस्तानवर 117 धावांची आघाडी मिळवली. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बाबरकडे चांगली फलंदाजी करून संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची मोठी संधी होती, मात्र त्यानं पुन्हा निराशा केली. तो 22 धावा करून तंबूत परतला.
बाबर आझमचा कसोटी मधील हा खराब फॉर्म गेल्या अनेक सामन्यांपासून जारी आहे. मागील 7 कसोटी सामन्यांमध्ये या स्टार फलंदाजानं एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. बाबरनं मागील 7 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 275 धावा केल्या आहेत. त्यानं 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मोठी इनिंग खेळली होती. त्या कराची कसोटीत बाबरनं पाकिस्तानच्या पहिल्या डावात 161 धावा केल्या होत्या.
बाबर आझमची ही खराब कामगिरी पाहता त्याला कसोटी संघातून डच्चू देण्याची वेळ आल्याचं चाहते बोलत आहेत. पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्येही कर्णधार शान मसूद बाबर आझमचा त्याची फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणासाठी क्लास घेताना दिसला. अशा परिस्थितीत बाबरला बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेइंग 11 मधून बाहेर बसावं लागलं तर नवल नाही.
हेही वाचा –
मनू भाकरनं घेतली टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोची भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
“शिखर, तू नेहमीच आठवणीत राहणार”, गब्बरसाठी क्रिकेटच्या देवाचा खास मॅसेज
5 भारतीय खेळाडू ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, एकाची तुलना चक्क धोनीशी व्हायची!






