पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात नुकताच पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने एक डाव 44 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानकडून शान मसूदने 100 धावांची तर बाबर आझमने 143 धावांची शतकी खेळी करत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बाबर आझमने 2 स्थानांची झेप घेत डेव्हिड वॉर्नर आणि चेतेश्वर पुजाराला मागे टाकून 5 वे स्थान मिळवले. त्यामुळे आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारातील क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये असणारा बाबार आझम सध्या तरी एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
तो वनडे क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर टी20 क्रमवारीत तो फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तिन्ही क्रिकेट प्रकारातील क्रमवारीमध्ये त्याचे 800 पेक्षा अधिक गुण आहेत.
त्याचे वनडेमध्ये 829 गुण आहेत, कसोटीत 800 गुण आहेत. तर टी20मध्ये तो 879 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.
त्याच्या व्यतिरिक्त विराट कोहली कसोटी आणि वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. मात्र तो टी20 क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर आहे. तसेच विराटचे वनडे क्रमवारीत 869 गुण आहेत, कसोटी क्रमवारीत 928 गुण आहेत तर टी20मध्ये 673 गुण आहेत.
त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स वनडे क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर तर कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. मात्र तो टी20 क्रमवारीत 21 व्या क्रमांकावर आहे.





