शुक्रवारी (१० जून) पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पुनर्नियोजित ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना मुल्तान येथे पार पडला. हा सामना पाकिस्तानने १२० धावांनी जिंकला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने उत्कृष्ट फलंदाजीचा फॉर्म कायम राखत अर्धशतक केले आणि एक विक्रमही आपल्या नावे केला आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ५० षटकात ८ विकेट्स गमावत २७५ धावा केल्या होत्या. यामध्ये बाबरने ७७ धावांची खेळी करत एक विश्वपराक्रम केला. तो सलग नऊ सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा पुरूष वनडे क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. मागील काही सामन्यांपासून त्याची धावा करण्याची भूक काही संपली नाही असे दिसून येत आहे. सध्या तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे.
बाबरने (Babar Azam) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये १९६, ६७ आणि ५५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ५७, ११४ आणि १०५ धावा केल्या होत्या. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमात्र टी२० सामन्यात ६६ धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन वनडे सामन्यात त्याने १०३ आणि ७७ धावांची खेळी केली आहे.
बाबरने ८८ वनडे क्रिकेटमध्ये ६०.०१च्या सरासरीने ४४४१ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. पुरूष वनडे क्रिकेटमध्ये फक्त तीन खेळाडूंची सरासरी ६०च्या वर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी रस्सी वॅन दर दुसेन (Rassie Van Der Dussen) ७१.८४ सरासरीसह अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ३५ सामने खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ३३ सामन्यांमध्ये ६७ सरासरी असलेला नेदरलॅंडचा रेयान डोश्चेते आहे.
बाबर बरोबरच पाकिस्तानचा सलामीवर इमाम उल हकने लागोपाठ सहा वनडे सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ७२ धावा केल्या आहेत. बाबर-इमाम जोडीने लागोपाठ चौथ्या वनडे सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा कारनामा केला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ १५५ धावांवरच गारद झाला. मोहम्मद नवाजने १० षटकांमध्ये १९ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. त्याची ही कामगिरी विशेष ठरली आहे.
या मालिकेतील तिसरा वनडे सामना मुल्तान येथेच होणार असून तो रविवारी (१२ जून) खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत मालिका ३-० अशी खिशात घालण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकत रोहित- विराटचा विक्रम मोडायला निघालेला बाबर आझम, अर्धशतकावरच मानावं लागलं समाधान
गडी काय थांबना!, आयपीएल संपल्यानंतर अश्विन करतोय इंग्लंडविरुद्धच्या कसोटीची विशेष तयारी