ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाचे कामगिरी अद्याप अपेक्षेनुसार झाली नाही. विश्वचषक विजयाचे दावेदार म्हणून मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला पहिला सामन्यात भारताने तसेच दुसऱ्या सामन्यात पात्रता फेरीतून पुढे आलेल्या झिम्बाब्वेने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला नमवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. मात्र, संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याची कामगिरी अजूनही खराबच आहे.
विश्वचषकाआधी बाबर मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत तसेच न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेत शानदार फॉर्ममध्ये होता. मात्र, विश्वचषकात त्याच्या बॅटची धार अतिशय बोथट झालीये. भारतीय संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला पहिल्याच चेंडूवर पायचित केलेले. त्यानंतर झिम्बाब्वेविरूद्धही तो अपयशी ठरला. ब्रॅड एवान्सने केवळ चार धावांवर त्याला झेलबाद केले होते. नेदरलँड्सविरूद्धही फक्त चार धावा केलेल्या असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. अशाप्रकारे तो तीन सामन्यात केवळ आठ धावा करण्यात यशस्वी ठरला आहे.
केवळ विश्वचषकातच नव्हे तर काही दिवसांपूर्वी झालेल्या आशिया चषकातही तो असाच खराब फॉर्ममध्ये दिसलेला. त्या स्पर्धेत त्याने 10,9,14,0,30 व 5 अशा धावा केलेल्या. आशिया चषक व विश्वचषक या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांतील त्याची आकडेवारी आणखीनच खराब दिसते. 8.44 अशा खराब सरासरीने तो केवळ 76 धावा करू शकला आहे.
नेदरलँड्सविरूद्ध विजय मिळवल्याने पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिले. त्यांना आपले पुढील सामने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध खेळायचे आहेत. त्या सामन्यांमध्ये विजय मिळवूनही इतर सामन्यांच्या निकालांवर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीचे गणित अवलंबून असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक खुलासा! म्हणाला, ‘ड्र’ग्जने आयुष्य उद्ध्वस्त केले, पत्नीच्या मृत्यूने…’
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी