आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२१ वर्षाच्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला २०२१ वर्षाचा सर्वोत्तम एकदिवसीय पुरुष खेळाडू म्हणुन निवडण्यात आले. रविवारी (२३ जानेवारी) त्याचाच संघ सहकारी मोहम्मद रिझवानला गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी२० खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. दोन्ही पुरस्कारांचे मानकरी पाकिस्तानचे खेळाडू ठरले आहेत. सोमवारी आयसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूच्या नावाची घोषणा केली.
२०२१ मध्ये उत्कृष्ट कामगीरी दाखवणाऱ्या खेळाडूंना आयसीसीने सन्मानित केले आहे. पाकिस्तानचा कर्णधार असलेल्या बाबरने गेल्या वर्षी ६ एकदिवसीय सामने खेळले असले तरी त्याची कामगीरी आयसीसीच्या दृष्टीने सर्वोत्तम होती. या सामन्यांत त्याने २ शतके आणि १ अर्धशतकासह ६७ च्या सरासरीने ४०५ धावा केल्या.
बाबरशिवाय सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूच्या शर्यतीत बांगलादेशचा अष्टपैलु शकीब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आणि आयर्लंडचा महान फलंदाज पाॅल स्टर्लिंग हे खेळाडू होते. पाॅल स्टर्लिंगने गेल्यावर्षी १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७०५ धावा केल्या आहेत. मलानने ८ एकदिवसीय सामन्यांत ५०९ धावा केल्या होत्या.
बाबरच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभुत २-१ असे पराभूत केले होते. बाबरने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते,तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८२ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. त्यावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या ३२० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत बाबर आझमने एकाकी झुंज देत तीन सामन्यात १७७ धावा केल्या होत्या. इंग्लंडने पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला होता. या मालिकेत इतर कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला १०० किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या नव्हत्या. पाकिस्तानने इंग्लंड विरूद्धच्या अखेरच्या सामन्यात ३३१ धावा केल्या असून त्यामधील निम्म्याहुन जास्त धावा आझमने एकट्याने केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! स्मृतीने उंचावली भारताची मान! ठरली २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (mahasports.in)
“जर रोहित फिट असेल, तर त्याला कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार का बनवले जाऊ शकत नाही?” (mahasports.in)