सध्या वेस्ट इंडिजमध्ये एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक खेळला जात आहे. या स्पर्धेतून अनेक नवे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळतील. परंतु, या सर्वांमध्ये एक नाव स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. ते नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस ((Dewald Brevis). दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) याच्यासारखी शैली असणारा हा युवा फलंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (U19 Cricket World Cup 2022 West Indies)
‘बेबी एबी’ (Baby AB) व ‘एबी २.०’ या टोपण नावांनी क्रिकेटजगतात ब्रेविस आपली ओळख बनवताना दिसून येत आहे. याच ‘बेबी एबी’ ने जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावात आपले नाव नोंदविले आहे. इतकेच नव्हे तर त्याने, त्याचा आदर्श असणाऱ्या एबी डिव्हिलियर्स यांच्याप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
तुफान फॉर्ममध्ये आहे ब्रेविस
एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात ब्रेविस शानदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने स्पर्धेत अवघे चार सामने खेळताना ९०.५० च्या अविश्वसनीय सरासरीने ३ अर्धशतके व एका शतकाच्या मदतीने ३६२ धावा फटकावल्या आहेत. त्याची तीनपैकी दोन अर्धशतके ही अनुक्रमे ९५ व ९६ धावांची आली. यामध्ये तब्बल ३३ चौकार व ११ षटकारांचा समावेश आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवण्यासाठी तो प्रमुख दावेदार बनलाय.
मेगा लिलावात झाला आहे सहभागी
आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडेल. या लिलावासाठी ब्रेविसने स्वतःचे नाव नोंदविले आहे. यावेळी दोन नवीन संघ सहभागी झाल्याने त्याचे विकले जाणे देखील जवळपास निश्चित मानले जातेय. अनेक संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात. मात्र, त्याने आरसीबीसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने आरसीबीच्या जर्सीतील आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,
“दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. त्यानंतर मला आयपीएलमध्ये माझे आदर्श असलेल्या एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली यांच्याप्रमाणे आरसीबीसाठी खेळायला आवडेल. माझ्या फलंदाजीसह लेगस्पिन गोलंदाजीने अष्टपैलू म्हणून भूमिका पार पाडू शकतो.”
एबी डिव्हिलियर्स नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला असल्याने जगाला दुसरा एबी लाभल्याचे देखील सांगितले जातेय. (Dewald Brevis In IPL)
महत्वाच्या बातम्या-