आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे आयोजन करणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येणार आहेत. मात्र दोन्ही देशांतील तणावपूर्ण नातेसंबंधांमुळे अनेक भारतीय चाहत्यांना हा महामुकाबला खेळला जाऊ नये असे वाटते. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्येही दोन वेळा भारतीय दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. आता आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावरही धोका निर्माण झाला आहे.
ज्या पद्धतीने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता, तशीच परिस्थिती आशिया कपमध्येही पाहायला मिळेल का?
माजी भारतीय सुपरस्टार हरभजन सिंगने (Harbhajan Singh) टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले , त्यांनी समजून घेतले पाहिजे की काय गरजेचे आहे आणि काय नाही. हे खूप सोपे आहे. माझ्यासाठी, तो सैनिक जो सीमेवर उभा आहे, ज्याच्या कुटुंबाला त्याला नेहमी भेटता येत नाही, जो कधी कधी आपले प्राण देतो आणि कायमचा घरी परतत नाही, त्याचे बलिदान आपल्यासाठी फार मोठे आहे. त्याच्या तुलनेत, आपण एक क्रिकेट सामना खेळणे थांबवू शकत नाही ही गोष्ट फारच छोटी आहे.





