काही दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रामुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर ४ राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या इंग्लंड दौऱ्यात ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
तत्पुर्वी १८ जून ते २२ जून या कालावधीत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगणार आहे. साउथम्पटन येथे होणारा हा सामना उभय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. परंतु भारतीय संघाचे १८ जून या तारखेशी नकोसे कनेक्शन आहे. मागील ५-६ वर्षांपासून भारतीय संघासाठी हा दिवस अतिशय दुर्दैवी सिद्ध झाला आहे.
अशात यंदा विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ या नकोशा दिवसाची मालिका खंडित करेल का पुन्हा नशिबापुढे गुडघे टेकेल?, याची चिंता सर्वांना सतावत आहे.
१८ जून आणि भारतीय संघाचे कनेक्शन
भारतीय संघाने ६ वर्षांपुर्वी म्हणजे २०१५ साली बांग्लादेशविरुद्ध १८ जून रोजी वनडे सामना खेळला होता. या सामन्यात बांग्लादेशने भारताचा ७९ धावांच्या फरकाने पराभव केला होता. त्यापुढील वनडे सामनाही गमावत भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला वनडे मालिका पराभव नोंदवला होता.
त्यानंतर २०१६ साली १८ जून रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी२० सामना झाला होता. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अवघ्या २ धावांनी तो सामना गमावला होता. परंतु पुढील सलग २ टी२० सामने जिंकत भारताने टी२० मालिका आपल्या नावावर केली होती.
जून १८, २०१७ रोजी भारताने कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने तब्बल १८० धावांनी भारताला चारीमुंड्या चित केले होते.
अशाप्रकारे भारताने मागील ६ वर्षांत १८ जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या हाती निराशाच आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणारा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही १८ जून रोजीच सुरू होणार आहे. अशात भारतीय संघ हा सामना गमावत या अनलकी दिवशी क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात सामना गमावण्याचा नकोशा विक्रम नोंदवेल, का विजयासह या अशुभ दिवसाला शुभ बनवेल? हे पाहावे लागेल.