-आदित्य गुंड
एक काळ होता जेव्हा लोक विचारायचे,
“सचिन आहे ना अजून?”
सचिननंतर हे भाग्य लाभलेला एकमेव खेळाडू म्हणजे धोनी. भारताचे ४-५ गडी बाद झाले तरी “धोनी आहे ना अजून?” या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं आलं की लोक निर्धास्त असायचे. सामना जिंकला जाणार याची कुठेतरी खात्री असायची. आता हा प्रश्नच विचारायची संधी मिळणार नाही. कारण धोनी आता नाहीये. तो निवृत्त झालाय. नेहमीप्रमाणे सगळ्यांना धक्का देत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. कालच त्याच्या चेन्नईत आगमनाच्या बातमीने इंटरनेट हलवून सोडलं होतं. आयपीएल नंतर पुढच्या वर्षीचा टी२० विश्वचषक खेळुनच माही निवृत्त होणार अशी सगळ्यांची धारणा होती. अशातच माहीने आज पुन्हा एकदा इंटरनेट हलवून टाकलं. निवृत्तीची घोषित करतानाही ‘मै पल दो पल का शायर हूँ’ म्हणत त्याने युवक आणि जुने लोक या सगळयांना पुन्हा एकदा आपलसं केलं.
दादानंतर कोण? हा प्रश्न पडलेला असताना माही भारतीय क्रिकेटच्या पटलावर आला. सचिनसारख्या मोठ्या खेळाडूने केलेल्या शिफारसीने त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा मुकूट चढवला. त्यानंतर त्याने भारतासाठी काय काय मिळवलं हे सर्वज्ञात आहे. ‘द मॅन विथ मिडास टच’ वगैरे असतं तसलं काहीतरी होता माही!
त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यात क्रिकेट तज्ञ खंडीभर चुका काढत. अगदी त्याचे कट्टर फॅन्ससुद्धा हे मान्य करतील. पण त्याने फरक कधीच पडला नाही. काहीतरी आडाम तडाम खेळून का होईना तो मॅच काढून द्यायचा. त्याच्याकडे अगदी झिरो स्किल होतं असंही नाही पण एक चांगला फलंदाज तो निश्चित नव्हता. कधीकधी तर त्याचा डिफेन्स पाहताना हसू यायचं. त्याने आपल्या खेळाने ती बाब कायम दुय्यम राहील याची खबरदारी घेतली.
स्किलचा विषय निघालाच आहे तर विकेटकिपिंगबद्दल बोललंच पाहिजे. धोनीने जगातील उदयोन्मुख विकेटकीपर्सना विकेटकीपिंगचा वस्तुपाठ घालून दिला. विकेटकीपिंग करतानाचा त्याचा वेग, चौफेर नजर,फलंदाज कुठे आहे हे बघत फिल्डरला योग्य त्या एन्ड ला थ्रो करायला सांगणे हे सगळं कमाल होतं. भारताला पुन्हा त्या लेव्हलचा विकेटकीपर मिळणे नजीकच्या काळात तरी अवघड दिसते.
माहीचं दुसरं स्किल म्हणजे त्याची नेतृत्वशैली. क्रिकेटच्या अनेक रूढ समीकरणांना त्याने फाटा दिला. ‘हा असं का करतोय?’ पासून ते ‘धोनी करतोय म्हणजे काहीतरी विचार करूनच करत असणार.’ इथपर्यंत लोक आले यातच त्याच्या नेतृत्वगुणांची पावती आली.
धोनीच्या आधी कर्णधार झाले नाहीत का? नक्कीच झाले. मग धोनीचा एवढा उदोउदो का? कितीही झालं तरी त्याने १९८३ नंतर भारताला विश्वचषक मिळवून दिला. टी२० विश्वचषक फारसा गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांना एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकल्यावर धोनीच्या यशावर शिक्कामोर्तब करावेच लागले.
भारतात सोशल मीडियाचा उदय होत असताना धोनी कर्णधार बनला. याचा धोनी ब्रँड बनण्यात खूप फायदा झाला. धोनीच्या आधीसुद्धा क्रिकेटर्सचे फॅन होते, आजही आहेत. पण धोनीच्या फॅन्ससारखे फॅन्स कुणालाच लाभले नाहीत. धोनीबद्दल एक वाईट शब्दसुद्धा ऐकून घेतील तर शपथ. मग आमच्यासारखे लोक त्याची आकडेवारी काढून फॅन्सला दाखवायचे. आकडे खोटं बोलत नाहीत. पण तरी फॅन्स माघार घेत नसत. मग धोनीने देशासाठी एवढं केलं, तेवढं केलं यांसारख्या गोष्टी पुढे आणल्या जातात. हे सगळं मान्य असलं तरी चुकीला चूक म्हणणं अपेक्षित आहे हे धोनीच्या फॅन्सला कधी कळललंच नाही. किमान आता तरी हे फॅन्स जरा सूज्ञपणे वागतील अशी अपेक्षा आहे.
धोनीच्या निवृत्तीने बीसीसीआयचा मार्केटिंग साठीचा एक महत्वाचा मोहरा कमी झालाय. कितीही काही असलं तरी धोनी हा ब्रँड होता,आहे. विराट ब्रँड असला तरी अजून धोनीएवढा मोठा नाही. रोहितलासुद्धा वेळ आहे. इथेही धोनीची जागा घेणारं कुणी सध्यातरी नाही. बाकी धोनीने निवृत्ती घेतल्यावर बीसीसीआयने ज्या पद्धतीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही बातमी जाहीर केली ते अतिशय निंदनीय आहे. जिथे आयसीसीच्या ट्विटर हँडलवरून धोनीसाठी तीन मिनिटांचा खास व्हिडीओ (जुना असला तरी) टाकून त्याला सन्मान दिला जातो तिथे बीसीसीआयने केलेलं ट्विट अगदीच माती आहे.
एखादा खेळाडू निवृत्त होतोय आणि राजकारण,चित्रपट, संगीत या सगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक त्याला ट्विट करत शुभेच्छा देतात अस चित्र याआधी सचिनच्या निवृत्तीच्या वेळी दिसलं होतं. त्या निमित्ताने माही आजही किती मोठा आहे हे दिसून आलं.
आपली निवृत्तीची वेळ स्वतः ठरविण्याचे भाग्य फार कमी क्रिकेटर्सना मिळते. धोनी त्यातलाच एक. त्याने इतकं कमावून ठेवलं की त्याला कोणी ‘तू रिटायर हो’ असं म्हणू शकलं नाही. अर्थात लेख, शोज मधून त्याच्यावर भरमसाठ टीका झाली. अलीकडच्या काळातील त्याचा खेळ अतिशय क्लेश देणारा होता. पण तरीही धोनी स्वतः निवृत्ती बाबत काही बोलत नव्हता. शेवटी त्याने आपल्या अंदाजात सगळ्याना धक्का दिला. पुढील वर्षी भारतात होणारा टी२० विश्वचषक, जवळपास चाळिशीला टेकलेला धोनी, फिट फिट म्हटला तरी आता कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे याची जाणीव त्यालाही झालीच असेल. त्या निमित्ताने बीसीसीआयला या विश्वचषकासाठी चांगला विकेटकीपर शोधण्यासाठी त्याने पुरेसा वेळही दिला. जाताजातासुद्धा आपली दूरदृष्टी दाखवूनच गेला.
गेल्या काही वर्षातला त्याचा खेळ बघून टीका करणाऱ्यांमध्ये मीही होतो.आज मात्र माहीला त्याचं ड्यु क्रेडिट दिलंच पाहिजे. मिस यू वगैरे नाही पण एक चांगला कर्णधार भारताने गमावला असं निश्चित म्हणेल.
या निमित्ताने थोडस रैनाबद्दल. धोनी बरोबरची घनिष्ठ मैत्री वगैरे सगळं ठीक असलं तरी त्याने निवृत्त जाहीर केली म्हणून मीसुद्धा करणार हे जरा अति झालं. भारतीय संघात पुनरागमन करणे रैनाला अवघड होते हे ग्राह्य धरले तरी! मुळात धोनीच्या नादात रैनाला कुणी विचारणार नाही. यात कुठेतरी रैनाने स्वतःचाच एक खेळाडू म्हणून अपमान केला असे वाटते. रैना इतकाही वाईट नव्हता की त्याच्याबद्दल काहीच बोलले जाऊ नये. मात्र धोनीला फॉलो करत त्याने नेमक हेच केलं. आज धोनीच्या निवृत्तीच्या नादात रैनासारख्या खेळाडूवर कुणी काही बोलतही नाही हे कुठेतरी बोचतं. असो. भारताचा मधल्या फळीतील एक उत्तम डावखुरा फलंदाज म्हणून त्याची कायम आठवण राहील.
बहती हवा सा था वो
उड़ती पतंग सा था वो
कहाँ गया.. उसे ढूँढो
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
कहाँ से आया था वो..
छू के हमारे दिल कोकहाँ गया..
उसे ढूँढो..