महिंद्रा आणि महात्मा गांघी यांनी बाल उत्कर्ष क्रीडा मंडळाने आपल्या “सुवर्ण महोत्सवानिमित्त” आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे अजिंक्यपद मिळविले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.त्या दोघांनाही रोख रु.दहा हजार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई, लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी एअर इंडियाचे आव्हान ३९-२३असे सहज परतवीत “बाल उत्कर्ष चषक व रोख रु. एक लाख आपल्या खात्यात जमा केले. सुरुवाती पासून आक्रमक खेळ करीत मध्यांतराला २३-१०अशी घेणाऱ्या महिंद्राने नंतर देखील एअर इंडियाला जवळपास येण्याची संधी दिली नाही.
आनंद पाटील, अजिंक्य पवार यांना थोपविणे एअर इंडियाला जमले नाही. तसेच महिंद्राने क्षेत्ररक्षण भेदणे एअर इंडियाच्या चढाईपट्टूना जड जात होते. महिंद्राच्या स्वप्नील शिंदेचा बचाव उत्तम होता. एअर इंडियाच्या उमेश म्हात्रे, आशिष मोहिते, सोमवार यांना या सामन्यात सूर सापडला नाही.
महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत “बाल उत्कर्ष चषक” व रोख रु.एकाहत्तर हजार आपल्या नावे केले. नुकत्याच झालेल्या महापौर चषकावर आपले नाव कोरल्याने उत्साह द्विगुणित झालेल्या महात्माने त्याच आत्मविश्वासाने खेळ करीत हा सामना सहज खिशात टाकला. उत्तरार्धात जोरदार खेळ करीत २०-१०अशी आघाडी घेणाऱ्या महात्माने उत्तरार्धात त्याच तडफेने खेळ करी हा सामना १८गुणाने जिंकला.
पूजा किणी,सायली जाधव यांच्या झंजावाती चढायांना संघर्षकडे उत्तर नव्हते. तसेच सृष्टी चाळके, तेजस्वी पाटेकर यांच्या अभेद्य क्षेत्ररक्षण भेदून कोमल देवकर, निखिता यांना गुण मिळविणे जमत नव्हते.पूजा जाधव, दीपा बुर्ते यांचा बचाव देखील दुबळा ठरला.
या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महिंद्राने महा. पोलिसांचा २६-२१ असा, तर एअर इंडियाने भारत पेट्रोलीयमचा ३९-२३असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली होती. महिलांत महात्मा गांधीने शिव ओम् चा ३४-२३ असा,तर संघर्षने स्वराज्यचा २८-२२असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. या चारही उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. पंधरा हजार प्रदान करण्यात आले.
पुरुषांत स्पर्धेतील उत्कृष्ट चढई व पकडीचा खेळाडू म्हणून अनुक्रमे सोमवीर व उमेश म्हात्रे या दोन्ही एअर इंडियाच्या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पाच हजार देऊन गौरविण्यात आले. महिलांत हा मान संघर्षाच्या कोमल देवकर (चढाई) व महात्मा गांधीच्या सृष्टी चाळके (पकड) यांना देण्यात आला.
दोघींनाही रोख रु.पाच हजार देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी खासदार मोहन रावले, बेस्ट समिती चेअरमन व नगरसेवक अनिल कोकीळ, सामाजिक कार्यकर्ते सुधीर साळवी, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र साळवी यांच्या उपस्थितीत पार पडला.