fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या गणेश जगतापला विजेतेपद

पुणे । सोलापूरच्या गणेश जगतापने पंजाबच्या साबा कोहालीला ६-५ असे एका गुणाच्या फरकाने पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुले गटाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खुल्या गटाच्या अंतिम लढतीत गणेश जगताप व साबा कोहाली यांच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. गणेश जगतापने ‘लपेट’ डाव टाकताना दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर लगेचच साबा कोहालीने भारद्वाज डाव टाकताना २ गुण मिळवत लढत बरोबरी साधली. त्यानंतर गणेशने रोलिंग करताना २ गुण कमावले.

साबाने गणेशला बाहेर ढकलताना २ गुणांची कमाई करत पुन्हा बरोबरी साधली. गणेशने साबाला दोन वेळा सर्कलच्या बाहेर ढकलताना प्रत्येकी एक गुणांची कमाई केली. त्यांतर साबाला केवळ १ गुणाची कमाई करता आली. निर्धारित वेळ संपल्याने सोलापूरचा गणेश जगताप विजेता ठरला.

६५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अक्षय हिरागुडेने पुण्याच्या निखील कदमला १२-३ असे पराभूत करताना गटाचे विजेतेपद पटकावले. ७४ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या कुमार शेलारने श्रीधर मुळीकला ९-५ असे पराभूत करताना गटाचे विजेतेपदक पटकावले. ८६ किलो गटाच्या लढतीत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने बीडच्या अमोल मुंढेला पराभूत करताना गटाचे विजेतेपद पटकावले.

You might also like