काही दिवसांपूर्वी श्रीलंकन दिग्गज अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याची विकेट चर्चेचा विषय ठरली होती. विश्वचषक 2023च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्याला टाईम आऊट नियमानुसार पंचांनी बाद दिले हेत. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने अपील केल्यामुळे हा निर्णय दिला गेला. पण आता याच बांगलादेश संघाच्या फलंदाजाने अशाच एका अनोख्या पद्धतीने विकेट गमावली आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान हा प्रकार पाहायला मिळाला.
बांगलादेश आणि न्यूझीलंड (BAN vs NZ) यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने 150 धावांनी विजय मिळवला. दुसरा आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना बुधवारी (6 डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. पहिल्या डावात बांगलादेश संघ 200 धावांपर्यंतही मजल मारू शकला नाही. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण पहिल्या दिवशी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) याची विकेट. दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड (obstructing the field) नियमानुसार बाद झाला. विशेष म्हणजे अशा पद्धतीने विकेट गमावणारा मुशफिकूर रहीम पहिलाच बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. एकंदरीत विचार केला, तर अशा प्रकारे विकेट गमावणारा तो जगातील 14वा खेळाडू ठरला आहे.
Mushfiqur Rahim out for obstructing the field.
– He is the first Bangladesh batter to dismiss by this way in cricket history.pic.twitter.com/MfZONDzswk
— Johns. (@CricCrazyJohns) December 6, 2023
बांगलादेशच्या डावातील 41व्या षटकात हा संपूर्ण प्रकार घडला. त्याचे झाले असे की, कायल जेमिसन या षटकात गोलंदाजी करत होता. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्यामुळे रहीम संयमी खेळी करत होता. या षटकातील एक चेंडू रहीमच्या बॅट लागून हवेत स्पिन होत होता. चेंडूचा टप्पा खाली पडताच तो चथेट स्टंप्समध्ये जाणार, हे रहीमच्या लक्षात आले. पण बांगलादेशी फलंदाजाने आपली विकेट वाचवण्यासाठी उजव्या हाताने चेंडू अडवला. रहीमने केलेला प्रकार पाहून गोलंदाज जेमिसनसह न्यूझीलंड संघाकडून विकेटसाठी अपील केली गेली. मैदानी पंचांनी आपापसात चर्चा करून निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. रिप्लेमध्ये घडला प्रकार पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी मात्र मुशफिकूर रहीमला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद घोषित केले.
काय आहे नियम?
मुशफिकूर रहीमने ज्या पद्धतीने विकेट गमावली, त्याला 2017 आधी हँडलिंग द बॉल असे म्हटले जात होते. पण नंतर क्रिकेट नियमांमध्ये बदल झाल्यामुळे अशा प्रकारच्या विकेटला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डमध्ये गणेले जाऊ लागले. या नियमानुसार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने चेंडू हाताने अडवला (ज्या हाताने बॅट पकडली नाही त्या हाताने) तर तो बाद असतो. फलंदाजाने चेंडूला हात लावण्याआधी पंच किंवा विरोधी संघाची परवानगी घेणे अपेक्षित आहे. विरोधी संघाला चेंडू परद देण्याच्या हेतूने जरी फलंदाजाने चेंडूला हात लावला, तरीही अपील केल्यानंतर त्याला विकेट गमवावी लागू शकते.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बांगलादेश संघ 66.2 षटकांमध्ये 172 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ पहिल्या दिवसाखेर 12.4 षटकांमध्ये 5 विकेट्स नुकसानावर 55 धावा करू शकला. बांगलादेशच्या तुलनेत न्यूझीलंडची अवस्था सध्या कठीण झाली आहे. दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्ये बांगलादेशी गोलंदाजांचे प्रदर्शन सामन्यात निर्णायक ठरू शकते. (BAN vs NZ 2nd Test Mushfiqur Rahim out for obstructing the field)
महत्वाच्या बातम्या –
कैफच्या संघाला नमवत रैनाच्या संघाची फायनलमध्ये धडक, सलामी फलंदाजाने झळकावले शानदार शतक
ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ भारतीय युवा खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडेल