बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात आफ्रिकने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 575 धावांवर आपला डाव घोषित केला. या सामन्यात पाहुण्या संघाने इतके षटकार ठोकले की, भारताचा विक्रम जवळपास मोडीत निघाला असता. बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकूण 17 षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात संघाने मारलेला हा तिसरा सर्वाधिक षटकार आहे. एका डावात 18 षटकार मारण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. किवी संघाने 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एका डावात 22 षटकार मारले होते. त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संघाला एका डावात 20 किंवा त्याहून अधिक षटकार मारता आलेले नाहीत. तर भारत या यादीत 18 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता.
दक्षिण आफ्रिका आता 17 षटकारांसह या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आफ्रिकन संघासह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. कांगारूंनी 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध इतकेच षटकार ठोकले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार
22 षटकार- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, 2014
18 षटकार – भारत विरुद्ध इंग्लंड, 2024
17 षटकार- ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे, 2024
17 षटकार- दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश, 2024
16 षटकार- श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, 2023
टोनी डी जोर्जी (177), ट्रिस्टन स्टब्स (106) आणि वियान मुल्डर (105*) यांच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी 6 गडी गमावून 575 धावा करून पहिला डाव घोषित केला. यानंतर दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत बांग्लादेशने अवघ्या 9 षटकांत 38 धावांवर 4 विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिका अजूनही 537 धावांनी पुढे आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.
हेही वाचा-
मेगा लिलावापूर्वी हलचालींना वेग, हा स्टार खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात येण्याची शक्यता
विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी
“त्यांनी कराराच्या अटींचे उल्लंघन…”, गॅरी कर्स्टनच्या राजीनाम्यावर पीसीबी प्रमुखांचे मोठे वक्तव्य