दक्षिण आफ्रिकेची टीम बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आली आहे. 21 ऑक्टोबरपासून ही कसोटी मालिका सुरू होईल. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणाही करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या संघात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन समावेश करण्यात आला आहे. शाकिबचा हा शेवटचा कसोटी सामना असू शकतो. मात्र शाकिब अल हसन या सामन्यात खेळू शकणार नाही, असं दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे, या सामन्यात शाकिबच्या जीवाला धोका असू शकतो.
शाकिब अल हसन बुधवारी रात्री दुबईला पोहोचला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बांगलादेशला जाण्यापासून रोखण्यात आलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसक निदर्शनांमध्येही शाकिबचं नाव पुढे आलं होतं. यादरम्यान त्याच्यावर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून शाकिब देशात परतल्यास त्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शाकिब अल हसन हा हसिना सरकारचा समर्थक आहे. तो बांगलादेशच्या बरखास्त सरकारचा सदस्य होता. तो पक्षातून खासदार म्हणून निवडून आला होता. जेव्हा त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला, तेव्हा त्याच्या विरोधात मीरपूरमध्ये निदर्शनं झाली होती. त्यामुळे शाकिब या कसोटीत खेळला आणि कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रतिमेवर होईल, अशी भीती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
या कारणामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड कोणतीही जोखीम घेण्याच्या तयारीत नाही. यामुळे शाकिबचं निरोपाचा सामना खेळणं आता अवघड झालं आहे. शाकिबची क्रिकेट कारकीर्दही वादांच्या भोवऱ्यात सापडली असून त्याचं मायदेशात शेवटचा सामना खेळण्याचं स्वप्न अधुरं राहू शकतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघ –नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान लस्लाम, महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), जेकर अली, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा
हेही वाचा –
पहिल्या डावानंतर न्यूझीलंडकडे मोठी आघाडी, टीम इंडिया बॅकफूटवर
भारत-न्यूझीलंड कसोटीत रवींद्रनं ठोकलं शतक, 12 वर्षांनंतर झाला हा पराक्रम!
टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट, 15 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं!






