शिवशक्ती, विश्वशांती, डॉ.शिरोडकर, श्री स्वामी समर्थ या मुंबई शहराच्या महिला संघाबरोबरच उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स, नवशक्ती स्पोर्ट्स, ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहू आणि धुळ्याच्या शिवशक्तीने “आमदार चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बंड्या मारुती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय स्थानिक पुरुषांत विजय क्लब, मिड-लाईन अकादमी, बाबुराब चांदेरे सोशल फौंडेशन-नांदेड यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या महिलांच्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात शिवशक्तीने विश्वशांतीचा 68-21 असा धुव्वा उडवीत या गटात अव्वल स्थान पटकाविले. तर विश्वशांतीने देखील द्वितीय स्थान मिळवीत बाद फेरी गाठली. ऋणाली भुवड, अक्षता पाटील, मानसी पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर पहिल्या डावातच 41-09 अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात देखील आपल्या खेळातील जोश कायम ठेवत मोठ्या फरकाने सामना खिशात टाकला. विश्वशांतीच्या भारती यादव, काजल शर्मा यांचा खेळ आज अगदीच ढेपाळला.
महिलांच्या क गटात उपनगरच्या महात्मा गांधीने ठाण्याच्या माऊली प्रतिष्ठानला 36-24असे नमवित या गटातून उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली. सलग दोन साखळी पराभवामुळे माऊली संघावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. स्नेहल चिंदरकर, करीना कामतेकर यांच्या उत्कृष्ट चढाया व करुणा रासमचा बचाव यामुळे हा विजय शक्य झाला. माऊलीच्या सोनाली कुर्वे, वैष्णवी मोरे बऱ्या खेळल्या. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सने ब गटात ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहूचा 53-23 असा पराभव करीत या गटात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर या गटात एक सामना जिंकत राजर्षिने देखील बाद फेरी गाठली. मेघा कदम, कशीश पाटील, साक्षी सावंत यांच्या अष्टपैलू खेळाने पहिल्या सत्रात 21-11अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रात आणखी धारदार खेळ करीत शिरोडकरने 30 गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. राजर्षिच्या साधना यादव, भगवती रावळ यांच्या प्रतिकार या सामन्यात दुबळा ठरला. उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्सने अमरहिंदला 52-26 असे नमवित साखळीत दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठली. अमरहिंदच्या सलग दुसरा पराभव झाल्यामुळे ते साखळीतच गारद झाले. बेबी जाधव, विज्योति गोळे, गायत्री देवळेकर यांच्या खेळाला नवशक्तीच्या विजयाचे श्रेय जाते.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजय क्लबने लायन्स स्पोर्ट्सचा 24-18 असा पराभव करीत प्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली.अत्यंत सावध खेळ करणाऱ्या विजयकडे विश्रांतीला 12-09अशी आघाडी होती. विश्रांतीनंतर दोन्ही संघाने तिसऱ्या चढाईवर भर देत खेळ केल्यामुळे सामना अगदीच संथ झाला. शेवटी विजयने 6 गुणांनी बाजी मारत आगेकूच केली. अमित चव्हाण, राजेश मिश्रा, प्रीतम लाड यांच्या संयमी खेळाने हे साध्य केले. लायन्सच्या विशाल करकटे, अभिजित दोरुगडे यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला.
नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने मुंबईच्या अमरचा 43-19असे पराभूत करीत आगेकूच केली. सोमनाथ देशमुख, राम अडगळे यांच्या झंजावाती खेळाने चांदेरे फौंडेशनने मोठ्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला. अमरचा अमन साळवी चमकला. रायगडच्या मिड-लाईनने सुयोग गायकर, वैभव मोरे, सौरभ वासकर यांच्या अष्टपैलू खेळाने मुंबईच्या विजय नवनाथवर 44-15अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईयन एफसी अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत, जमशेदपूर एफसीचा करणार सामना
ॲलन कोस्टाचा विजयी गोल, बंगळुरू एफसीने अखेरच्या क्षणाला नॉर्थ ईस्टला नमवले