गोवा| सूर गवसल्यानंतर अव्वल प्रतिस्पर्ध्याला सहज हरवता येते, हे बंगलोर एफसीने गुरुवारी दाखवून दिले. टिळक मैदान स्टेडियमवर झालेल्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील ‘साउदर्न डर्बी’मध्ये ‘इयर एन्डिंग’धमाका पेश करताना सुनील चेत्री आणि सहकाऱ्यांनी चेन्नईयन एफसीवर ४-२ असा मोठा विजय मिळवला. तसेच सात सामन्यांतील चार पराभव आणि तीन बरोबरींची मालिका खंडित केली.
पॉइंट्स टेबलमधील दहाव्या स्थानी असलेल्या बंगलोर एफसीच्या तुलनेत सहाव्या स्थानी असलेल्या चेन्नईयनचे पारडे जड होते. त्यात चौथ्या मिनिटाला गोल करत चेन्नईयननी धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन गोल करताना बंगलोरने आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी दोन गोल करत अप्रतिम विजयाची नोंद केली. बंगलोरच्या मोठ्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खेळाडूने सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे एक-दोन नव्हे तर चार खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले.
बंगलोरच्या विस्कळीत बचावाचा फायदा उठवत गुरमनप्रीत सिंगने रचलेल्या प्लानवर मिरलॅन मुर्झाइव्हने कळस चढवला. चौथ्या मिनिटाला आघाडी घेणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला. मात्र, सतर्क झालेल्या बंगलोरने बचावात कमालीची सुधारणा केली मध्यंतराला १२ मिनिटे शिल्लक असताना चेन्नईयनच्या गोंधळमय स्थितीचा फायदा बंगलोरला मिळाला. यावेळी मिळालेल्या पेनल्टीचे सोने करताना क्लीटन सिल्वाने बंगलोरला १-१ अशी बरोबरी गाठून दिली. पाच मिनिटांच्या फरकाने म्हणजे ४३व्या मिनिटाला अलॅन कोस्टाने
अप्रतिम गोल करताना बंगलोरला २-१ असे आघाडीवर नेले. चेन्नईयनने कमबॅक करताना ४९व्या मिनिटाला २-२ बरोबरी साधली. याचे क्रेडिट रहिम अलीला जाते. मात्र, उत्तरार्धातील मध्यावर चार मिनिटांच्या फरकाने दोन गोल करताना बंगलोरने एकूण आघाडी ४-२ वर नेली. ही आघाडी निर्णायक ठरली. बंगलोरचे शेवटचे दोन गोल उदंता सिंग (७०व्या मिनिटाला) आणि प्रतीक चौधरीने (७४व्या मिनिटाला) केले.
बंगलोरमध्ये विजय मिळवण्याची क्षमता आहे. सर्व खेळाडू मेहनत घेताहेत. संघ पुन्हा फॉर्ममध्ये परतेल, हा प्रशिक्षक मार्को पेझाओली यांचा विश्वास खेळाडूंनी चेन्नईयनविरुद्ध सार्थ ठरवला. ९ सामन्यांतून तितकेच गुण मिळवणारा बंगलोर एफसी आता थोडा वर म्हणजे आठव्या स्थानी स्थिरावला आहे.
दुसरीकडे, गुणतालिकेत तळाला असलेल्या बंगलोरला हरवून विजयी मार्गावर परतानाच अव्वल चार संघात (टॉप फोर) स्थान मिळवण्याचे लक्ष्य चेन्नईयनचे स्वप्न तूर्तास अपुरे राहिले. गुरुवारच्या पराभवानंतर ८ सामन्यांतून ११ गुणांसह ते सहाव्या स्थानी कायम राहिले. चेन्नईयनचा हा सलग दुसरा पराभव आहे.
निकाल : बंगलोर एफसी ४(क्लीटन सिल्वा-पेनल्टी-३८व्या मिनिटाला, अलॅन कोस्टा-४३व्या मिनिटाला, उदंता सिंग-७०व्या मिनिटाला,
प्रतीक चौधरी-७४व्या मिनिटाला) विजयी वि. चेन्नईयन एफसी २(मुरलॅन मुर्झेइव्ह-चौथ्या मिनिटाला, रहिम अली-४९व्या मिनिटाला)