बांगलादेश क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार महमदुल्ला रियादने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेली १२ वर्षे तो बांगलादेश कसोटी संघाचा भाग होता. शुक्रवार (२६ नोव्हेंबर) पासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या आधी त्याने ही घोषणा केली आहे. महमदुल्लाने नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक आणि पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत बांगलादेश संघाचे नेतृत्व केले होते. त्याला आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते.
एका निवेदनात बांगलादेशच्या टी२० कर्णधाराने म्हटले आहे की, “ज्या कसोटी क्रिकेटचा मी एवढा दीर्घकाळ भाग होतो ते सोडणे सोपे नाही. मी नेहमीच उच्च स्थानावर जाण्याचा विचार केला. मात्र, माझा विश्वास आहे की माझ्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करण्याची हीच योग्य वेळ आहे.”
महमदुल्लाने पुढे म्हटले, “कसोटी संघात परतल्यावर मला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीबी अध्यक्षांचे आभार मानू इच्छितो. मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी माझ्या संघसहकाऱ्यांचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो. बांगलादेश कसोटी क्रिकेटसाठी खेळणे हा अत्यंत मोठा सन्मान आहे. मी अनेक चांगल्या आठवणी जपून ठेवीन.
महमदुल्लाने पुढे म्हटले की, “मी कसोटीतून निवृत्त होत असलो तरी, मी अजूनही एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत राहीन आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये माझ्या देशासाठी माझे सर्वोत्तम देणे सुरूच ठेवेन, त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
या ३५ वर्षीय खेळाडूने यावर्षी जुलैमध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आपली ५० वी आणि शेवटची कसोटी खेळली होती. या कसोटी सामन्यात बांगलादेशने २२० धावांनी विजय नोंदवला होता. त्याच्या अंतिम डावात त्याने नाबाद १५० धावा केल्या होत्या, हे त्याचे कसोटीतील पाचवे शतक होते आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. महमदुल्लाहने ३३.४९ च्या सरासरीने एकूण २९१४ धावा केल्या होत्या आणि कसोटीत ४३ बळी घेतले होते. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्वही केले आहे.