बांगलादेश क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज तमीम इकबालने टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. बांगलादेश संघाने शनिवारी (१६ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकला आणि मालिका ३-० अशा अंतराने नावावर केली. मालिका जिंकल्यानंतर तमीमने टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. मागच्या काही काळापासून तमीम टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेईल, असा अंदाज बांधला जात होता.
वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका गयानामध्ये खेळली गेली. मालिकेतील तिन्ही सामने बांगलादेशने नावावर केले आणि यजमान वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिला. शेवटचा सामना बांगलादेशने ४ विकेट्स राखून नावावर केला. या मालिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने या मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि मालिकावीर ठरला.
सामना संपल्यानंतर तमीमने बांग्ला भाषेत फेसबुक पोस्ट करून टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने केलेल्या छोट्याशा पोस्टमध्ये लिहिले होते की, “मला आजपासून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त समजावे. सर्वांचे आभार.” मागच्या काही आठवड्यांपासून तमीमच्या निवृत्तीचा अंदाज बांधला जात होता. आता फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. वयाच्या ३३ व्या वर्षी तमीमने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्याने टी-२० क्रिकेटमधून ६ महिन्यांची विश्रांती घेतली होती.
यावर्षी २७ जानेवारीला तमीमने अशी माहिती दिली होती की, “माझे पूर्ण लक्ष कसोटी आणि वनडेवर असेल. आम्हाला जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि २०२३ वनडे विश्वचषकासाठी क्वालीफाय होण्यासाठी तयारी करत आहोत. मी पुढचे ६ महिने टी-२० आंतरराष्ट्रीयविषयी विचार करणार नाहीये. मला आशा आहे की, खेळणारे एवढे चांगले प्रदर्शन करतील की, टी-२० मध्ये माझी गरज पडणार नाही. परंतु देव ना करो संघ आणि क्रिकेट बोर्डला माझी गरज पडलीच आणि मी तयार असेल, तर मी याविषयी विचार करेल.”
तमीमने बांगलादेशसाठी २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मार्च २०२० मध्ये त्याने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने या प्रकारात एकूण ७८ सामने खेळले आणि १७५८ धावा केल्या. यामध्ये त्याचे सर्वोत्तम प्रदर्श १०३ धावांचे राहिले आहे. या धावा तमीमने २४ पेक्षा अधिक सरासरीने आणि ११७ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत, ज्यामध्ये ७ अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. त्याने या प्रकारात एकूण १८९ चौकार आणि ४५ षटकार मारले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या विक्रमाला पडणार खिंडार? आफ्रिदीचा होणारा जावई पोहचलाय अगदी जवळ
लक्ष्मण ‘बॅक टू वर्क’! एनसीएच्या नव्या बॅचला दिले क्रिकेटचे धडे
प्रसिद्ध आऊट, लॉर्ड इन?, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये होणार महत्वाचे बदल