टी20 विश्वचषक 2024 चा 15 वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. डल्लास येथील ग्रँड पेयरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. हा लो स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये दोन्ही संघ शेवटपर्यंत लढले.
लक्ष्याचा पाठलाग करताना तौहीद हृदोयनं बांगलादेशसाठी 20 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तर श्रीलंकेसाठी नुवान तुषारानं सर्वाधिक 4 बळी घेतले.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला बांगलादेशी गोलंदाजांनी 20 षटकांत 9 बाद 124 धावांवर रोखलं. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रहमान आणि रिशाद हुसनैनं प्रत्येकी 3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव चढ-उतारांनी भरलेला होता. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र त्यानंतर लिटन दास आणि हृदोय यांनी डाव सांभाळला. अखेरच्या षटकांमध्ये श्रीलंकेनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी बांगलादेशनं अतिशय रोमांचक विजयाची नोंद केली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशनं श्रीलंकेचा पहिल्यांदाच पराभव केला आहे.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी डावाच्या शेवटच्या बांगलादेशला काही धक्के दिले. नुवान तुषारानं केवळ 3 धावा देत 2 बळी घेतले, ज्यामुळे सामना पुन्हा श्रीलंकेच्या बाजूनं झुकला होता. पण अखेर बांगलादेशनं बाजी मारली.
125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारच्या रूपानं पहिला धक्का बसला, जो खाते न उघडता धनंजय डी सिल्वाचा बळी ठरला. त्यानंतर संघानं दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तनजीद हसनच्या रूपानं दुसरी विकेट गमावली. तो 6 चेंडूत केवळ 3 धावा करू शकला. यानंतर बांगलादेशला लगेच तिसरा धक्का बसला. यावेळी कर्णधार नझमुल हुसेन शांतो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं 13 चेंडूत केवळ 7 धावा केल्या.
यानंतर चौथ्या विकेटसाठी तौहीद हृदोय आणि लिटन दास यांनी 63 धावांची (38 चेंडू) भागीदारी करून संघाला स्थैर्य मिळवून दिलं. 12व्या षटकात हसरंगानं हृदोयला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यावर ही भागीदारी संपुष्टात आली. तौहीदनं 20 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 40 धावा केल्या. त्यानंतर लिटन दासही 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. लिटन दासनं 38 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 36 धावा केल्या. इथून बांगलादेशची पुन्हा एकदा फरफट झाली.
यानंतर 17व्या षटकात शाकिब अल हसन आणि 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिशाद हुसेन बाद झाला. शाकिबनं 8 तर रिशादनं 1 धाव केली. रिशादनंतर पुढच्याच चेंडूवर नुवान तुषारनं मुस्तफिझूर रहमानला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर महमुदुल्लाह आणि तंजीम हसन साबिक यांनी 12 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. महमुदुल्लाह 13 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 16 आणि तंजीम 1 धावांवर नाबाद राहिला.
श्रीलंकेकडून नुवान तुषारानं सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यानं 4 षटकात केवळ 18 धावा दिल्या. याशिवाय कर्णधार वनिंदू हसरंगानं 2 बळी घेतले. हसरंगानं 4 षटकात 32 धावा दिल्या. धनंजय डी सिल्वा आणि मथिशा पाथिराना यांना 1-1 बळी मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका
टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव
क्रिझपर्यंत पोहोचूनही धावबाद झाला ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील विचित्र घटना; पाहा संपूर्ण VIDEO