बांगलादेश क्रिकेट संघाने अलीकडेच पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत करून कसोटी मालिका जिंकली. आता बांगलादेश क्रिकेट संघाला 19 सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, त्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डात घबराटीचे वातावरण पाहायला मिळतेय. त्यांच्या बोर्डाचे संचालक खालिद महमूद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महमूद यांच्याशिवाय मंडळातील इतर काही सदस्यांनीही आपली पदे सोडण्याचा निर्णय घेतला.
खालिद महमूद बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी खेळाडू असून, काही काळ संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. 2013 मध्ये गाजी अश्रफ यांच्या विरोधात निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. संचालक म्हणून सलग तिसरा कार्यकाळ सांभाळत असलेल्या खालिद महमूद यांनी देशातील राजकीय बदल पाहता सध्याचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महमूद यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे गेम डेव्हलपमेंट चेअरमन म्हणूनही दीर्घकाळ काम केले आहे. याच काळात बांगलादेशच्या अंडर 19 संघाने 2020 मध्ये आयसीसी अंडर-19 विश्वचषकही जिंकला होता. खालिद महमूद व्यतिरिक्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये जलाल युनूस, शफीउल आलम चौधरी आणि नैमुर रहमान यांचा समावेश आहे.
बांगलादेश 19 सप्टेंबरपासून भारताविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ज्यासाठी बोर्डाने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. गेल्या आठवड्यातच बीसीसीआयने चेन्नई येथे होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. ज्यामध्ये विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडूही संघात परतताना दिसले होते. मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर होईल. दोन्ही संघा दरम्यान तीन वर्षानंतर कसोटी मालिका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला अंडर-19 आशिया कप सुरू होणार, जय शाहांची मोठी घोषणा
“आम्ही पुन्हा पाकिस्तानला हरवू” अमेरिका खेळाडूने उडवली पाकिस्तानची खिल्ली
सचिनचा ‘महान’ रेकाॅर्ड मोडणार ‘हा’ दिग्गज खेळाडू? असं आहे समीकरण