इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 क्रिकेट विश्वचषकात बांगलादेशचा साखळी फेरीतील पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना 2 जूलैला एजबस्टन स्टेडियमवर पार पडणार आहे.
या सामन्याआधी बांगलादेशने अफगाणिस्तानला सोमवारी 62 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. आता भारताविरुद्धच्या सामन्याआधी त्यांना 7 दिवसांची कालावधी मिळणार आहे. बांगलादेशने भारताला आत्तापर्यंत कडवी लढत दिली आहे.
त्यांनी मागीलवर्षी भारताबरोबर दोन अंतिम सामने खेळले आणि या सामन्यात ते थोडक्यात विजयापासून मुकले आहेत. हे अंतिम सामने निदाहास ट्रॉफी आणि आशिया चषकात झाले होते. त्यामुळे 2 जूलैला बांगलादेश आणि भारत या शेजारी देशांमध्ये होणाऱ्या सामन्यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
या सामन्याआधी बांगलादेशचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी भारताला कडवी लढत देण्यासाठी बांगलादेश संघ सज्ज असल्याचे सुचवले आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार जोशी म्हणाले, ‘आम्ही वेळोवेळी मर्यादीत षटकांमध्ये चांगला संघ असल्याचे दाखवले आहे. आम्ही आयर्लंडमध्ये विजय मिळवला. आम्ही वेस्ट इंडिजला घरात आणि बाहेर पराभूत केले आहे आणि आम्ही भारताला मागील तीन वर्षात तीनवेळा पराभूत करण्याच्या खूप जवळ पोहोचलो होतो.’
भारताकडून 69 वनडे आणि 15 कसोटी सामने खेळलेले माजी फिरकीपटू जोशी म्हणाले, ‘जेव्हाही आम्ही भारताबरोबर खेळलो तेव्हा मी भारताला खूप जवळून पाहिले आहे. आम्हाला माहित आहे त्यांना कुठे गोलंदाजी करायची.’
विशेष म्हणजे 2000 मध्ये जेव्हा बांगलादेशने भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता तेव्हा जोशींना त्यांच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. ते मागील अनेक दिवसांपासून बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.
2019 च्या विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध खेळण्याआधी भारतीय संघ 27 जूनला विंडीज विरुद्ध तर 30 जूनला इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशला बसला हा मोठा धक्का
–मिशेल स्टार्कच्या या दबरदस्त यॉर्करने स्टोक्स झाला क्लीन बोल्ड! पहा व्हिडिओ
–अशी आहेत विश्वचषक २०१९च्या सेमीफायनलमध्ये राहिलेल्या ३ जागांसाठीची समीकरणं