बांगलादेश संघाने नुकतीच एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अलीकडे अनेक संघांना जे जमले नाही ते बांगलादेशने केले आहे. त्यांनी न्यूझीलंडला त्यांच्याच मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत केले आहे, तेही त्यांचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीत. बांगलादेशने माउंट मौनगानुई येथे गतविजेत्या न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव (Bangladesh Historic Test Win) करून न्यूझीलंडमध्ये कोणत्याही क्रिकेट स्वरुपातील (कसोटी, एकदिवसीय आणि टी20) पहिला विजय नोंदवला आहे.
आता हा विजय ऐतिहासिक असल्याने त्याचे सेलिब्रेशनही तितकेच मोठे असेल. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर बांगलादेश संघाने ड्रेसिंग रूममध्ये (Bangladesh Players Celebration) जल्लोष साजरा केला. याचा व्हिडिओ बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, संघाचा 34 वर्षीय अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीमला संबोधित केल्यानंतर, सर्व खेळाडू एकत्र उड्या मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रहीम असे म्हणताना ऐकू येते की, जर आपण ऐतिहासिक विजय नोंदवला तर त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. यानंतर सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारू लागतात. त्यानंतर ते सर्वजण मिळून बांगलादेशच्या मातृभाषेत ‘हम होंगे कामयाब एक दिन’, हे गीत गाऊ लागतात.
Bangladesh Team dressing room celebrations following the historic win at Mount Maunganui.#BCB #cricket #BANvsNZ pic.twitter.com/78pGFQ30wP
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 5, 2022
बांगलादेश क्रिकेट संघाच्या कसोटीतील या सर्वात मोठ्या विजयाचा हिरो ठरला इबादत हुसेन. चौथ्या दिवशीच त्याने बांगलादेशला ऐतिहासिक विजयाच्या जवळ आणले होते. इबादतने पाचव्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या शेवटच्या दोन विकेट्स घेतल्या. परिणामी यजमानांचा दुसरा डाव 169 धावांत आटोपला, ही त्यांची बांगलादेशविरुद्धची नीचांकी धावसंख्या आहे. न्यूझीलंड पहिल्या डावात 130 धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी फक्त 40 धावांचे आव्हान मिळाले, जे बांगलादेशने दोन विकेट्स गमावून पूर्ण केल्या. या सामन्यात एकूण 7 बळी घेणाऱ्या इबादत हुसेनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने दुसऱ्या डावात 6 बळी घेतले.
बांगलादेशचा त्यांच्या देशाबाहेर कसोटी क्रिकेटमधला हा सहावा विजय आहे आणि पहिल्या पाच क्रमांकाच्या संघाविरुद्धचा पहिला विजय आहे. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या तर बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. या विजयासह त्यांनी न्यूझीलंडचा मायभूमीवर सलग १७ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रमही खंडित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा कव्हर ड्राईव्ह अन् सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हचा जबरा फॅन आहे ‘हा’ ऑसी क्रिकेटपटू
हेही पाहा-