---Advertisement---

बांग्लादेशची गरुडभरारी! भारतासह दिग्गज संघांना पछाडत ‘या’ क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान

On: गुरूवार, मे 27, 2021 4:06 PM
---Advertisement---

मागील काही काळात बांगलादेश क्रिकेट संघाने आपल्या शानदार कामगिरीमुळे सर्वांनाच प्रभावित केले आहे. जागतिक पातळीवर क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी बांगलादेश संघाचे उत्तम क्रिकेट खेळणे गरजेचे असल्याचे अनेक क्रिकेट पंडितांनी यापूर्वीच वक्तव्य केले होते. पूर्वी केवळ एखाद्या क्रिकेट सामन्यात उलटफेर करणारा बांगलादेशचा संघ आता सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील देखील बांगलादेशने विजयी आघाडी घेतली आहे. यासह बांगलादेश संघ वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेच्या अव्वल स्थानी देखील विराजमान झाला आहे.

जागतिक क्रिकेट नियामक मंडळाने (आयसीसी) 2020 मध्ये वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेस सुरुवात केली होती. वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेमध्ये प्रमुख 13 संघांचा समावेश करण्यात आला आहे. या 13 संघांपैकी गुणतालिकेतील सुरुवातीचे 8 संघ 2023 साली होणाऱ्या वनडे क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरतील. या संपूर्ण कालावधीत सर्व संघ 24-24 सामने खेळणार आहेत.

श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौर्‍यावर असून, या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाबरोबर वार्षिक पगारामुळे सुरू असलेल्या वादात श्रीलंकन संघ एकजुटीने मैदानावर खेळताना दिसत नाहीये. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 33 धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना डकवर्थ लुईस नियमाद्वारे 103 धावांनी पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यात विजय मिळवत बांगलादेशने जगातील सर्व प्रमुख संघाना गुणतालिकेत पछाडत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विशेष म्हणजे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना येत्या 28 मे रोजी खेळला जाणार असून,या सामन्यातही बांगलादेशने विजय मिळवल्यास त्यांचे व इतर संघांमधील अंतर मोठ्या प्रमाणात वाढेल. वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास, बांगलादेशचा संघ 8 सामन्यांत 5 विजय आणि 3 पराभवानंतर 50 गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसर्‍या स्थानावर इंग्लंडचा संघ असून, त्यांनी 9 सामन्यांत 4 विजय आणि 5 पराभवानंतर 40 गुण मिळवले आहेत. भारतीय संघ या गुणतालिकेत आठव्या स्थानी असून, भारताचे 3 विजय व 3 पराभवासह 29 गुण आहेत. मात्र 2023 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे, भारतीय संघात त्यात थेट सहभागी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते; विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत

आयपीएल २०२१साठीच्या राहिलेल्या सामन्यांच्या ठिकाणांची नावे आली समोर, यापूर्वीही केलेय यशस्वीरित्या आयोजन

या ३ कारणांमुळे अर्जुन तेंडुलकरला मिळाले नाही मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---