श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात देखील बांगलादेश संघाने श्रीलंका संघाला धूळ चारत १०३ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.पहिल्या सामन्यात देखील श्रीलंकन संघाला ३३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत बांगलादेश संघाने २-० ने विजयी आघाडी घेत वनडे सुपर लीगच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना ४८.१ षटकात सर्व बाद २४५ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये बांगलादेश संघाकडून मुशफिकुर रहीमने उत्कृष्ट फलंदाजी करत, १२७ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १० चौकार लगावले होते. तर महमुद्दुल्लाने ५८ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाला ४० षटकात, अवघ्या १४१ धावा करता आल्या. यासोबतच बांगलादेश संघाने हा सामना १०३ धावांनी आपल्या नावावर केला.
वनडे सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेश संघ अव्वल स्थानी
आयसीसीच्या वनडे सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेश संघाने प्रथम स्थान गाठले आहे. बांगलादेश संघाने श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत सलग २ सामने जिंकले आहेत. याचा फायदा त्यांना वनडे सुपर लीगच्या गुणतालिकेत झाला आहे. बांगलादेश संघ ५० गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
बांगलादेश संघानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी ४० गुण आहेत. नेट रनरेटच्या जोरावर दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघ आहे. तसेच भारतीय संघ या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाने ६ सामने खेळले आहेत. यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आला आहे. या यादीत,सर्वात शेवटी श्रीलंका संघ आहे. २०२३ विश्वचषकाच्या दृष्टीने ही वनडे सुपर लीग महत्त्वाची आहे. असे असले तरी भारत या विश्वचषकाचा यजमान असल्याने त्यांना या गुणतालिकेत कोणताही क्रमांक मिळाला तरी विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील सामना: २२ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम
विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’