बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत ९७ धावांनी विजय मिळवला. परंतु बांगलादेश संघाने ही मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेश संघाचा कर्णधार तमिम इकबाल याने असे काही कृत्य केले, ज्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दंड आकारला आहे.
कुठल्याही फलंदाजाला वाटते की, त्याने मैदानात येऊन चांगली कामगिरी करावी. परंतु जेव्हा फलंदाज लवकर बाद होतो; तेव्हा त्यांना राग अनावर होतो आणि यावेळी त्यांच्या हातून नकोशा गोष्टी घडतात. असाच काहीसा प्रकार बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात घडला आहे. तमिम इकबालने बाद झाल्यानंतर अपशब्दांचा वापर केल्याचे दिसून आले आहे. ही बाब आयसीसीच्या निदर्शनात येताच आयसीसीने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
तर झाले असे की, तिसऱ्या वनडे सामन्यात कुशल परेराने केलेल्या शतकीय खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने ५० षटकअखेर ६ बाद २८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. बांगलादेश संघाला ४२.३ षटकात अवघ्या १८९ धावा करता आल्या.
याच डावातील १० व्या षटकात तमिम इकबालला राग अनावर झाला होता. तो दहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद झाला होता. पंचांनी आपला निर्णय दिल्यानंतर तमिम इकबालने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद करार केले. रिव्ह्यूतही आपण बाद असल्याचे पाहून त्याने अपशब्दांचा वापर केला.
त्यानंतर त्याच्यावर आयसीसीतर्फे १५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. आयसीसीने दिलेल्या निवेदनात लिहिले आहे की, खेळाडू आणि आयसीसीमधील सहयोगी सदस्यांच्या आचारसंहितेच्या कलम २.३ मध्ये तमिम इकबाल दोषी आढळला आहे. यात आंतरराष्ट्रीय सामन्यात अपशब्द वापरल्याचा देखील उल्लेख आहे. यासोबतच त्याच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरीट पॉइंट देखील जोडला गेला आहे. एखाद्या खेळाडूने जर २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डीमेरीट गुण मिळवले; तर त्यांना निलंबित केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ३ भारतीय फलंदाज, ज्यांना सलामीला संधी मिळाली तर ठरतील ‘आक्रमक ओपनर’
विलगीकरणात ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘असे’ राहतात तंदुरुस्त, उपकर्णधाराने केला खुलासा
ऍडमिन असावा तर असा! आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थानने शेअर केला व्हिडिओ, हसून हसून व्हाल लोटपोट