बांगलादेश आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. बांगलादेशने यात 5 गडी गमावत 242 धावांपर्यंत मजल मारली. एक वेळ अडचणीत सापडलेल्या बांगलादेश संघाला अनुभवी अष्टपैलू शाकीब अल हसनने दिवसाच्या समाप्तीपर्यंत एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मदत केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर तमिम इक्बाल केवळ 9 धावा करून बाद झाला. यानंतर नजमुल शंटो (25) व कर्णधार मोमिनुल हक (26) यांना मिळालेल्या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. यादरम्यानच शदमन इस्लामने 59 धावांची चिवट अर्धशतकी खेळी केली. इस्लाम बाद झाला त्यावेळी बांगलादेशची अवस्था 4 बाद 134 झाली होती. अशा नाजूक परिस्थितीत शाकिब अल हसन व यष्टिरक्षक मुशफिकुर रहिमने बांगलादेशचा डाव सावरला.
शाकीब व रहिम यांनी महत्त्वाच्या क्षणी 59 धावांची भागीदारी केली. दोघेही आता मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच रहीम 39 धावांवर बाद झाला. यानंतर शाकिब व लिटन दासने बांगलादेशला आणखी पडझड होऊ न देता दिवसातील बाकी षटके खेळून काढली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शाकीबकडून सर्व बांगलादेशच्या चाहत्यांना शतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.
वेस्टइंडीज साठी जोमेल वॉरिकनने शानदार गोलंदाजी करत 3 गडी बाद केले. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वेस्टइंडीज कडून या सामन्यात काइल मेयर्स, शेन मोसले आणि एनक्रुमाह बोनर हे तीन खेळाडू आपले कसोटी पदार्पण करत आहेत. सामन्याचा दुसरा दिवस अतिशय रोमांचक असल्याने चाहत्यांसाठी उत्तम क्रिकेटची पर्वणी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ