दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात आजपासून(3 नोव्हेंबर) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून भारताकडून 26 वर्षीय शिवम दुबे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तो भारताकडून टी20 मध्ये खेळणारा 82 वा खेळाडू ठरला आहे.
त्याचबरोबर भारताने या सामन्यासाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलला संधी दिली आहे. त्याचबरोबर मधल्याफळीत श्रेयस अय्यरलाही संधी मिळाली आहे. तर रिषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. तसेच रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करतील.
गोलंदाजांमध्ये कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दिपक चाहर आणि खलील अहमद यांचा समावेश आहे.
बांगलादेशकडून मोहम्मद नाईमने टी20त पदार्पण केले आहे. त्याचबरोबर बांगलादेशने त्यांच्या संघात 3 वेगवान गोलंदाज, 1 फिरकी गोलंदाज आणि 1 अष्टपैलू क्रिकेटपटू असे संमिश्रण ठेवले आहे.
भारत आणि बांगलादेश संघात आत्तापर्यंत 8 टी20 सामने खेळण्यात आले आहेत. हे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यामुळे आता भारताविरुद्ध पहिला टी20 विजय मिळवण्यास बांगलादेशचा संघ उत्सुक असेल. तर भारतीय संघ बांगलादेशवरील त्यांचे वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करतील.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद.
बांगलादेश – लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद नाईम, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमूदुल्लाह (कर्णधार), आफिफ हुसेन, मोसाद्दक हुसेन, अमीनुल इस्लाम, शफीउल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, अल-अमीन हुसेन






