स्कॉटलंड क्रिकेट संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पराभव करून मोठा विजय नोंदवला आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) खेळलेल्या ‘ब’ गटातील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने बांगलादेशचा ६ धावांनी पराभव करत दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयासह स्कॉटलंडला पूर्ण २ गुण मिळाले. स्कॉटलंडने दिलेल्या १४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकांत ७ गडी बाद १३४ धावाच करू शकला.
स्कॉटिश वेगवान गोलंदाजांनी अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि दोन्ही सलामीवीर सौम्या सरकार (५) आणि लिटन दास (५) यांच्या विकेट घेत बांगलादेशला दबावाखाली आणले. ज्यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. परिस्थिती अशी होती की, बांगलादेश पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्सवर फक्त २५ धावांपर्यंत पोहोचू शकला होता.
बांगलादेशचे दोन सर्वात अनुभवी खेळाडू रहीम आणि साकिब यांनी डाव सावरण्यासाठी प्रयत्न केले. दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली पण, त्यासाठी ४६ चेंडू खर्च केले, ज्यामुळे संघावर अजून दबाव वाढला. रहिमने मायकल लीस्कला सलग दोन षटकार मारून नवव्या षटकात बांगलादेशची धावसंख्या ५० धावांवर नेली, पण ग्रीव्हजने उत्कृष्ट गोलंदाजी करत आणि दोघांनाही तंबूत पाठवले आणि बांगलादेशला परत पिछाडीवर ढकलले.
कॅलम मॅकलॉडने ग्रीव्हजच्या पहिल्या चेंडूवर साकिबचा सुंदर झेल घेतला. या लेगस्पिनरने पुढच्या षटकात रहिमला गुगलीवर त्रिफळाचीत केले. त्याला अफीफ हुसैनची (१८) विकेट मिळाली असती, पण मायकेल क्रॉसने त्याचा झेल सोडला. पण डावखुरा फिरकीपटू वॅटने त्याला जास्त काळ टिकू दिले नाही. कर्णधार महमुदुल्लाह (२३) आणि मेहदी हसन (नाबाद १३) हे बांगलादेशचा पराभव टाळू शकले नाही.
स्कॉटलंडकडून ब्रॅडली व्हील्सने ३ विकेट्स घेतल्या, तर ख्रिस ग्रीव्हजने २ विकेट्स घेतल्या. जोश डेव्ही आणि मार्क वाइट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जॉर्ज मुन्सेच्या एका वेळी २९ धावा असूनही स्कॉटलंड सहा गडी गमावून ५३ धावांवर संघर्ष करत होता. पण ख्रिस ग्रीव्ह्सने २८ चेंडूत ४५ धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. त्याने आपल्या खेळीत चार चौकार, दोन षटकार लगावले. मार्क वॅट १७ चेंडूत २२ धावा केल्या. दोघांनी ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सन्मानजनक १४० धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
आपला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना, ख्रिस ग्रीव्ह्सने समानवीराचा पुरस्कार पटकावला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
आयपीएल २०२१ मधून भारतीय संघासाठी मिळाले तीन अद्भुत खेळाडू, ‘हा’ अष्टपैलू घेऊ शकतो पांड्याची जागा